

पालघर (ठाणे) : जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांना जोडणार्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असतानाच आता पालघर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची सुद्धा अक्षरशः चाळण झाल्याने खड्डे बुजविणे किंवा घाटातील वळण घेताना मोठ्या अपघातांची शक्यता आता वाढली आहे.
मोखाडा ते त्र्यंबकेश्वर घाटात तर रस्त्यांच्या दोन्ही कडा साईटपट्ट्या वाहून गेल्याने दोन गाड्या पास होणे सुद्धा जिकरीचे बनले आहे. अशावेळी ट्रॅफिक थांबून वाहनांची मागेपुढे हालचाल करून गाड्या पास कराव्या लागत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध मोठे खड्डे झाल्याने अनेक वाहनांचे नुकसान सुद्धा झाले आहे. असे असताना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे ढुंकूनही बघायला तयार नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पालघर ते मनोर, पालघर ते घोडबंदर, मोखाडा ते त्र्यंबकेश्वर ते नाशिक विक्रमगड ते चारोटी, चारोळी ते जव्हार म्हणजे आजघडीला पालघर मुख्यालयात जाताना तुम्ही कोणत्याही मार्गाने जाल तरीही तुम्हाला या खड्ड्यांचा सामना करावाच लागतो.
दरम्यान या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही, असाच प्रश्न सध्या निर्माण होत आहे. जिल्ह्यातील वाडा ते भिवंडी रस्त्याबाबत आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र त्या रस्त्याचा शाश्वत विकास अद्याप झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील संपूर्ण मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातील काही रस्ते सा. बां. विभाग काही जि. प. बांधकाम विभाग तर काही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येतात मात्र हे खड्डे बुजविण्याची तसदी कोणी घेत नसल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर घाट सध्या मृत्यूचा घाट बनला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काही वळणावर खड्डे असून साईड पट्टी नसल्याने छोट्या गाड्यांचे चेंबर फुटण्याची शक्यता आहे. तर समोर मोठी वाहने आली तर थेट घासून जाण्याची शक्यता निर्माण होते यामुळे या घाटातही ट्रॅफिक जाम व्हायला लागल्याचे सुद्धा दिसून येते.
नाशिक मोखाडा रस्ता खराब झाल्याने याचा परिणाम येथील शासकीय कामकाजावर, विकासावर व थेट शिक्षणावर व्हायला लागल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसे मजेशीर आहे. कारण मोखाडा तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय आणि एकूणच, शिक्षण विभाग यातील 90% सरकारी अधिकारी कर्मचारी हे नाशिक वरून ये जा करतात. यामुळे या खराब रस्त्यांचा फटका यांना सुद्धा बसत असून शाळासुद्धा आता उशिरा भरायला लागल्याचे एकूणच दिसून येत आहे.