Raghoji Bhangre memorial : आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरेंचे समाधीस्थळ दुर्लक्षित
किन्हवली : संतोष दवणे
वासुदेव बळवंत फडके यांच्याही आधी क्रांतिकार्याची पताका खांद्यावर घेणा-या महादेव कोळी समाजातील महान क्रांतिकारक राघोजी रामजी भांगरे यांचे वास्तव्य शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावात होते. इंग्रजांनी त्यांना फाशी दिल्यानंतर याच गावात त्यांचा अंत्यविधी झाल्याची साक्ष देणारी त्यांची भग्नावस्थेतील समाधी श्रद्धास्थळ म्हणून घोषित करावी व या ठिकाणाचा विकास करावा अशी मागणी शहापूर तालुका श्रमजीवी संघटनेने शासनाकडे केली आहे.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहापूरात रॅली काढून या मागणीचे निवेदन शहापूर तहसील कार्यालयाला देण्यात आले.
जल-जंगल-जमीन या नैसर्गिक संपत्तीवर हक्क सांगणा-या आदिवासींचा हा अधिकार पेशवाई संपुष्टात आल्यावर इंग्रजांनी काढून घेतला.त्यामुळे चिडलेल्या संथाळ, कोल, मुंडा, भिल्ल, महादेव कोळी, प्रधान, गोंड या आदिवासी जमातींनी इंग्रजांना टोकाचा विरोध सुरु केला. नाशिकमध्ये जन्माला आलेले क्रांतिकारक रामजी भांगरे यांचे पुत्र व महादेव कोळी जमातीचे नेतृत्व करत उलगुलानचा नारा बुलंद करणारे शूर योद्धा राघोजी भांगरे या क्रांतिसुर्याचा लढा आदिवासींच्या या संघर्षाला देशभर ओळख निर्माण करून देणारा ठरला.
शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळ उंभ्रई गावच्या भांगर्या डोंगरावर आपल्या कुटुंबासोबत गुप्त वास्तव्य करणार्या राघोजींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.परंतु फंदफितुरीमुळे जेरबंद झाल्यानंतर 2 मे 1848 ला या वीर क्रांतिकारकाला इंग्रजांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली व त्यांच्या स्वकियांनी त्यांचा मृतदेह उंभ्रई येथे आणून गावाशेजारीच दफन केला.
दुर्दैवाने त्यांचा हा संघर्षमय इतिहास इतिहासाच्या पानांवर उमटलाच नाही. त्यामुळेच त्यांचे समाधीस्थळ शासनाच्या खिजगणतीतही नाही. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष मालू हुमणे, सचिव प्रकाश खोडका, लक्ष्मण चौधरी, ईश्वर बनसोडे, विशाल मुकणे, रुपेश अहिरे, कमलाकर शिंदे, कैलास मुकणे व आदिवासी बांधवांनी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांना निवेदन देवून उंभ्रईतील भांगरेंच्या समाधीस्थळाला श्रद्धास्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या ठिकाणी रस्ता, समाधीची डागडुजी, प्रकाश व्यवस्था, माहिती फलक, स्वच्छता या बाबींकडे लक्ष देण्याची विनंतीही प्रशासनाला करण्यात आली.
भांगरेंच्या समाधीस्थळाकडे लक्ष देणार का?
या गावातील उच्चशिक्षित व्यक्तीमत्व हनुमंत चौधरी यांनी व आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवणारे शिक्षक विलास गवारी यांनी भांगरेंच्या कार्याला सातत्याने शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला असून श्रमजीवी संघटनेच्या मागणीनंतर तरी शासन भांगरेंच्या समाधीस्थळाकडे लक्ष देणार का असा सवाल आदिवासी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

