

ठाणे : मुंबई ते गोवा हे प्रवासप्रेमी आणि पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय मार्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, सततची दुरवस्था आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने जाणार्यांसाठीही 8 ते 9 तासांचा वेळ आणि बुकिंगची समस्या कायम आहे. मात्र आता, या सगळ्या अडचणींना मागे टाकत मुंबई ते गोवा प्रवास अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे आणि तेही रस्त्याने किंवा रेल्वेने नव्हे, तर थेट समुद्रमार्गे!
समुद्रमार्गाने प्रवासाचे फायदे
रस्ते आणि रेल्वेच्या तुलनेत वेगवान, सुटसुटीत आणि ट्रॅफिकमुक्त अनुभव.
समुद्र सफरीचा आनंद - प्रवासासोबतच निसर्गसौंदर्य, समुद्राचे अप्रतिम दृश्य अनुभवता येणार.
वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक सोपा आणि आकर्षक होणार.
पर्यटनाला चालना - गोवा आणि कोकणातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार.
पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीचा पर्याय म्हणूनही हा जलमार्ग उपयुक्त ठरणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल 14 वर्षांपासून काम सुरू आहे, मात्र अजूनही अनेक भाग अपूर्णच आहेत. नवीन कोकण एक्सप्रेस वे आणि कोकण रेल्वे मार्गावरील सुपरफास्ट गाड्या ही पर्यायी वाहतूक व्यवस्था असली तरी, सततची गर्दी, वेळखाऊ प्रवास आणि अपुर्या सुविधा यामुळे प्रवासी हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रमार्गे जलद वाहतुकीचा पर्याय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मुंबई ते गोवा हे अंतर 589 किमी इतके आहे. मुंबई ते गोवा या प्रवासाठी सध्या वाहतुकीचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोकण रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मुंबई गोवा महामार्गे प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात. तर, रेल्वेने गेल्यास प्रवासासाठी 8 ते 9 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता समुद्र मार्गे हाच मुंबई गोवा प्रवास फक्त 6 तासात शक्य होणार आहे.
जल वाहतूक सेवा देणार्या एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो रो बोट सेवा सुरु केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांन मुंबई गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खाजगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो रो फेरी असेल. सुरुवातील प्रायोगीक तत्वातावर 60 प्रवाशांची क्षमता असलेल्या जहाजाच्या माध्यमातून ही रो रो सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या रो रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही राज्यं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. समुद्रमार्गे जलवाहतूक सुरू झाल्यानंतर या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पर्यटक प्रवास करणार. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, माजगाव बंदर आणि गोव्यातील मुरगाव बंदर पर्यटन स्थळ म्हणूनही अधिक प्रसिद्ध होणार. क्रूझ टूरिझमला देखील चालना मिळून कोकण किनारपट्टीवर नवे पर्यटन संधी उपलब्ध होणार. मुंबई गोवा जलवाहतूक कधी पर्यंत सुरु होईल याबाबत कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.