

नेवाळी (ठाणे) : डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील खोणी मार्ग हा वाहतूक कोंडीचा हॉट स्पॉट ठरला आहे. या मार्गावर जीवघेणे खड्डे तयार झाले असून या खड्यांमध्ये वाहने आदळून वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
एमआयडीसीच्या डोंबिवली-अंबरनाथ महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर गती घेणारी कामे पुन्हा कासवगतीने सुरू असतात. त्यामुळे महामार्गावर चाकरमानी आणि वाहनचालकांना समस्यांना समोर जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील वाहनचालकांना वाहतूक कोंडीसह खड्डेमय मार्गातूनच प्रवास करावा लागत आहे.
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या महत्वाच्या महामार्गावर समस्यांच अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. महामार्गावरील अपूर्ण असलेली गटारांची कामे, रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यांमुळे वाहनचालक प्रचंड हैराण झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात वाहनचालकांचे प्रवास हे महामार्गावरील साचलेल्या पुराच्या पाण्यातून झाले आहेत. तर महामार्गावर जागोजागी खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्यांचा मुख्य हॉटस्पॉट खोणी म्हाडा कॉलनी आहे. मात्र तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून देखील वाहनचालकांचा सुखकर प्रवास करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळ, सायंकाळच्या सुमारास कामावरून परतणाऱ्या कामगारवर्गाला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलीस देखील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र खड्यात वाहन आदळत असल्याने वाहनांचा वेग मंदावताच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे कोंडीमुक्त वाहनचालकांचा प्रवास करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक वाहतूक खोळंबली
काटई-अंबरनाथ महामार्ग हा तळोजा, अंबरनाथ, बदलापूर, अतिरिक्त अंबरनाथ या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा आहे. मात्र या महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कामांनी वेग घेतलेला नसल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा येथील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. येथील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सार्वजनिक वाहतूक देखील खोळंबली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या जाचातून मुक्ततेसाठी कोण पुढाकार घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.