TMC News | महानगरपालिकेकडून 810 कोटींची विक्रमी मालमत्ता करवसुली

करदात्यांची डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती
ठाणे महापालिका
ठाणे महापालिकाfile photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 810 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 850 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या 95 टक्के एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्त्वाचा स्रोत असल्याने मालमत्ता कर विभागाने कर संकलनास वर्षभर विशेष प्रयत्न केले. त्यात, मालमत्ताकराची देयके करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दिली. मालमत्ता कराची देयके प्रत्यक्ष प्रिंट करून करदात्यांना तत्काळ देण्यात आली. मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली तसेच महापालिकेच्या 21 संकलन केंद्रापैकी कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली. तसेच, संकलन केंद्रावर धनादेश, धनाकर्ष, एटीएम-डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू

करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणे सोयीस्कर होण्यासाठी जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान सर्व शनिवार, रविवार (दि.23) रोजी तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले. मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आले. गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना कर भरणे सोयीस्कर होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचे नियोजन केले. मालमत्ता कर भरण्यास करदात्यांना एसएमएसद्वारे स्मरण देण्यात आले. तसेच, ज्या करदात्यांनी विहीत मुदतीत कर भरला नाही, अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित व इतर कारवाई करण्यात आली.

मालमत्ता करवसुलीबाबत आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केले. प्रभाग स्तरावरील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपिक व सर्व कर्मचार्‍यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले. मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी समाजमाध्यम, प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी दिली. 2023-24 आर्थिक वर्षामध्ये 702 कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने 108 कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.

डिजिटलसाठी करदात्यांची पसंती

ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करुन दिले. त्यामुळे 88.48 टक्के मालमत्ता कर हा डिजिटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिका प्रभाग कार्यक्षेत्रनिहाय कराचे संकलन

प्रभाग कार्यक्षेत्र - कर संकलन (कोटी रुपयांत)

  • नौपाडा-कोपरी - 100.05

  • वागळे इस्टेट - 31.50

  • लोकमान्य-सावरकर नगर - 33.67

  • वर्तकनगर - 122.20

  • माजिवडा-मानपाडा - 246.14

  • उथळसर - 51.07

  • कळवा - 29.05

  • मुंब्रा - 30.67

  • दिवा - 37.85

  • मुख्यालय व इतर - 127.80

  • एकूण - 810.00

मालमत्ता कर संकलनाचे प्रकार

कर भरण्याचे मार्ग - संकलनाची टक्केवारी

  • धनादेश (चेक) - 41.82%

  • ऑनलाईन - 30.97%

  • धनाकर्ष (डीडी) - 15.51%

  • एटीएम कम डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड - 0.18

  • रोख - 11.52%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news