TMC News | ठाणे महापालिकेत 337 कोटींचा भ्रष्टाचार, तत्कालीन आयुक्तांची सखोल चौकशी करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आनंद परांजपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिकाPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून लेखा परिक्षण न झाल्यामुळे ३३७ कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून, ठाणे महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहितीच उपलब्ध नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लेखा परीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारने महापालिकेला विचारणा करावी. तसेच ३३७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे महापालिकेचा २०२५-२६ चा ५ हजार ६४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी मांडला असून, यंदा अर्थसंकल्पात ६०० कोटींची वाढ झाली. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असतानाच, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. आता लेखा परीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा नवा उद्योग सुरू झाला आहे, असा आरोप माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला.

दरवर्षी महापालिकेचे नियमानुसार लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, २०१९-२० पर्यंतच महापालिकेचे लेखा परीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकारकडून विविध कामांसाठी प्राप्त निधी व अनुदान आणि कोरोना आपत्तीच्या काळातील अर्थसाह्याची माहिती उपलब्ध नसून, ३३७ कोटी रुपयांचा हिशोब लागलेला नाही, याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन, ठाणे महापालिकेच्या पाच वर्षांत न झालेल्या लेखा परिक्षण प्रकरणी चौकशी समिती नेमावी. तसेच ३३७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणाबरोबरच लेखा परीक्षण न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे.

महापालिका भ्रष्टाचाराचे `कुरण'!

ठाणे महापालिका प्रशासनाचा अंदाधुंद कारभार व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे लेखा परीक्षण झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक फुटकळ कामांच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केली. त्यातून जनतेच्या कररुपी पैशांची लूट झाली. महापालिकेतील काही `मस्तवाल' अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून, महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे, असा आरोप माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news