TMC Boiser | धक्कादायक! महावितरण फलक लावलेल्या वाहनातून युरियाची वाहतूक

TMC Boiser | धक्कादायक! महावितरण फलक लावलेल्या वाहनातून युरियाची वाहतूक

युरिया काळाबाजाराचा संशय : बोईसर पोलिसांची कारवाई
Published on

बोईसर : महावितरण कंपनीच्या फलकासह युरिया खताची वाहतूक करणारा संशयित आयशर टेम्पो बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर युरिया खत आढळून आले असून कृषी विभागाच्या तपासणी अहवालानंतरच त्याचा शेतीसाठी वापर आहे की औद्योगिक प्रक्रियेसाठी, हे स्पष्ट होणार आहे.

सदर वाहनाचे मालक जयराम हरीराम यादव असून, वाहनावर एमएसईबी ऑन ड्युटी असा बोर्ड लावलेला होता. पोलिसांनी मुकुट टँक पेट्रोल पंपाजवळ टेम्पो अडवला. टेम्पोचालकाने दिलेल्या माहितीनुसार, हा युरिया मध्य प्रदेशातील इंदूर येथून औद्योगिक वापरासाठी तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यासाठी आणला गेला होता.

युरिया खताची कागदपत्रे व नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी कृषी विभागाला कळवण्यात आले आहे. युरियाचा नमुना तपासणी अहवाल आल्यानंतरच या साठ्याचा नेमका वापर कशासाठी होणार होता, हे स्पष्ट होईल. बोईसर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान चौधरी या प्रकरणाचा तपास करत असून, कृषी विभागाच्या अहवालानंतर प्रकरणाचा उलगडा होईल. मात्र, या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी काही साठेबाजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे.

युरिया काळाबाजाराचा संशय

शेतीसाठी वापरण्यात येणार्‍या युरियाची किंमत 300-350 रुपये प्रति गोणी असते, तर औद्योगिक वापराच्या युरियासाठी 2,500-3,000 रुपये दर असतो. शेतीसाठी स्वस्त मिळणारा युरिया औद्योगिक वापरासाठी काळ्या बाजारातून खरेदी केला जात असल्याने हंगामात शेतकर्‍यांना युरियाची टंचाई जाणवते.

माफियांच्या हालचालींवर शंका

सूत्रांच्या माहितीनुसार, वापी येथील एका नियमित युरिया पुरवठादाराशी आर्थिक वाद झाल्याने स्थानिक माफियांनी टेम्पो पकडून पोलिसांच्या हाती सुपूर्द केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे स्थानिक माफियांचे अंतर्गत वाद समोर आले असून, सध्या सर्वजण या प्रकरणावर नजर ठेवून आहेत.

टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत असून, यामुळे शेतकर्‍यांना होणारे नुकसान टाळण्यावर भर दिला जात आहे. औद्योगिक वापरासाठी शेतीसाठीच्या युरियाचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news