Thane | आंबिवलीच्या इराणी काबिल्यातील तिघे सराईत गुन्हेगार दोषमुक्त, मोक्का न्यायालयाचा निकाल

निष्काळजीपणे तपास करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची कुऱ्हाड
Three criminals from Irani Kabila of Ambivali acquitted, verdict of Mokka court
आंबिवलीच्या इराणी काबिल्यातील तिघे सराईत गुन्हेगार दोषमुक्तFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : गंभीर गुन्ह्यांत अटक केलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांची मोक्कामधून मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास योग्यरितीने न करणे, आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करण्यास असमर्थ ठरणे, साक्षी/पुरावे नाकाम ठरणे, आदी अनेक कारणांवरून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी न्यायालयाचे (मोक्का) न्यायमूर्ती अमित शेटे यांनी कल्याण जवळच्या आंबिवलीच्या इराणी काबिल्यातील चौघा सराईत गुन्हेगारांची मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे निष्काळजीपणे तपास करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.

कासिम अस्फर इराणी उर्फ सय्यद (35), भुरेलाल गुलाम इराणी (28), सर्फराज फिरोज इराणी उर्फ बागी (34) आणि झेनाली फिरोज इराणी उर्फ (31) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी काबिल्यातील रहिवासी आहेत. हा काबिला गेल्या अनेक वर्षांपासून चोर, चिटर, लुटारूंचा अड्डा म्हणून बदनाम आहे. या काबिल्यात चोरी-छुपे राहणाऱ्या प्रत्येक बदमाशांच्या शिरावर तोतया पोलिस, धूम स्टाईलने लूट, पैसै मोजण्यातून हातचलाखी, चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या यांसारख्या गुन्ह्यांच्या प्रत्येकी दहा-बारा मालिका आहेत.

कासिम इराणी उर्फ सय्यद, भुरेलाल इराणी, सर्फराज फिरोज इराणी उर्फ बागी आणि झेनाली इराणी या चौघा आरोपींवर कल्याणच्या पोलिसांनी सोनसाखळ्या, मंगळसूत्र लांबविणे, चोऱ्या, घरफोड्या, दरोडा अशा घटनांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी पुष्पावती कानडे यांची मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी कल्याणात दाखल करण्यात आलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली होती. सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी या चौघांवर दरोडा, सोन्याचा ऐवज चोरीचे आरोप करून त्यांच्याविरोधात मोक्का अर्थात संघटित गुन्हेगारी कायद्याने कारवाई केली होती. मोक्का कायद्यान्वये कारवाई झाल्याने चारही आरोपींचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग खडतर होता.

मोक्का न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर आरोपींचे वकील ॲड. पूनित माहिमकर, ॲड. जावेद शेख आणि ॲड. सुनील रवानी यांनी आरोपींविरूध्दचे पोलिसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. कथानक रचून हे आरोप करण्यात आल्याचे आरोपीच्या वकिलांनी मोक्का न्यायालयाला निक्षून सांगितले. आरोपींविरुध्द पोलिसांनी दाखल केलेल्या पुराव्याची कागदपत्रे न्यायालयाने तपासली. त्यामध्ये अनेक विसंगती आढळून आल्या. या प्रकरणात साक्षीदारांचा विचार न करता पोलिसांनी थेट पोलिस आयुक्तांना अहवाल देऊन या आरोपींवर कारवाई केल्याचे निष्कर्ष काढले.

मोक्क्याची कारवाई कोणत्या पुराव्यांवर ?

चौघा आरोपींवर दरोडा आणि सोन्याचा ऐवज चोरल्याचे आरोप असल्याने चोरीच्या घटना घडलेल्या जागा व ठिकाणांची माहिती कागदोपत्री न्यायालयाला दाखविण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली. पोलिसांनी कागदोपत्री दाखविलेली काही ठिकाणे अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींविरूध्द मोक्का लावण्याची कृती पोलिसांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे केली ? हे न्यायालयात सबळ पुराव्यानिशी दाखविण्यात पोलिस अपयशी ठरले. न्यायालयाने पोलिसांच्या तपास कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली. या प्रकरणाचा ढिसाळपध्दतीने तपास करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठीचे निर्देश देऊन हा निर्णय ठाणे पोलिस आयुक्तांना कळविण्याच्या न्यायालयाने सूचना दिल्या. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news