

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडला असलेल्या पोलिस चौकीजवळ असलेली चार दुकाने फोडणाऱ्या चोरट्याला गुरूवारी (दि.२३) पोलिसांनी अटक केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील चार दुकानातून चोरट्याने गल्ल्यांतील रोकड घेऊन पोबारा केला होता. दुकानदारांनी यासंदर्भात तक्रार करताच रामनगर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा चोरटा आयरे गाव भागातील क्रांतीनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र चव्हाण यांचे आयरे रोडला असलेल्या पोलिस चौकीच्या बाजुला पोळी-भाजीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता चव्हाण दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने चव्हाण यांच्या दुकानाचे लोखंडी शटर धारदार कटावणीने उचकटले. दुकानात प्रवेश करून तेथील गल्ल्यात जमा झालेली साडेनऊ हजारांची रक्कम चोरून नेली. चोरट्याने पोळी-भाजी केंद्रालगत असलेल्या गाळ्यांमधील पिशव्या दुरुस्ती, भेळ-पाणी-पुरी विक्रेता आणि पान टपरी फोडून रोकड चोरून नेली. पान टपरीचा मालक सकाळी दुकानात आला. त्यावेळी त्याला आपल्या दुकानासह पोळी-भाजी केंद्रात चोरी झाल्याचे समजले. आणखी चौकशी केली असता एकाच रांगेतील अन्य दोन दुकानांमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर आली होती.
महेंद्र चव्हाण यांच्यासह शेजारील दुकानदारांनी रविवारी सकाळी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील फुटेज तपासले. त्यामध्ये आयरे रोडला असलेल्या चौकीजवळील महेंद्र चव्हाण यांच्या पोळी-भाजी केंद्राचे शटर एक इसम उचकटताना आढळून आला. या इसमाची तात्काळ ओळख पटली. प्रथमेश पाटील असे चोरट्याचे नाव कळल्यानंतर पोलिसांनी त्याला आयरे पोलिस चौकीच्या मागील क्रांतीनगर झोपडपट्टीतून उचलले. चारही दुकानांमध्ये आपण चोरी केल्याची त्याने कबुली दिली. या चोरट्याने आणखी कुठे चोऱ्या-घरफोड्या केल्या आहेत का ? याचा चौकास तपास पोलिस करत आहेत.