

डोंबिवली : जम्मू-काश्मीर भागात ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने काही मार्ग बंद पडले होते. त्यामुळे पहलगाम येथेच थांबून तेथून दुसऱ्या दिवशी वैष्णोव देवी येथे जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीकर मानस पिंगळे यांनी थरारक अनुभव कथन केला.
पृथ्वीवरचे नंदनवन म्हणजे काश्मीर मानले जाते. सृष्टीसौंदर्य, बर्फाच्छादित डोंगर, घनदाट जंगल आणि थंडगार हवेचा आस्वाद घेण्यासाठी कुटुंबीयांसह आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी काश्मीर-पहलगाम येथे पर्यटनाकरिता गेलेले डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत राहणारे मानस पिंगळे यांनी काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे सांगून पहलगामहून निघालो आणि दहशतवादी हल्ल्यातून बचावल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला.
ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष मानस पिंगळे आपल्या कुटुंबीयांसह आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी काश्मीर-पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी २१ एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन टेकड्या उर्फ मिनी स्वीत्झर्लंडला पिंंगळे कुटुंबीयांनी भेट देऊन तेथे त्यांनी पर्यटनाचा सुखद अनुभव घेतला.
पहलगामपासून घोड्यावरून अर्धा तासाच्या प्रवासाने पर्यटक उंचावरील बैसरन टेकड्या (हिल्स) भागात जातात. याठिकाणी वाहनाने जाण्याची सुविधा नाही. महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी आणि माथेरानसारखे हे ठिकाण आहे. बैसरन टेकड्यांना मिनी स्वीत्झर्लंड म्हणून ओळखले जाते. अफाट सृष्टीसौंदर्याने हा भूभाग डवरलेला आहे. टेकड्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण मोकळे पठार आहे. या पठारावर हजारो देशी, विदेशी पर्यटक दररोज फिरण्यासाठी येतात. पहलगाम ते बैसरन टेकड्या भागात प्रचंड सुरक्षा व्यवस्था असल्याचे डोंबिवलीकर पर्यटक मानस पिंगळे यांनी सांगितले.
गोळीबाराच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि.21) मानस पिंगळे कुटुंबीयांसह पहलगाम भागातील बैसरन टेकड्या भागात फिरून आले. शनिवारी (दि.19) रात्री जम्मू-काश्मीर भागात ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने काही मार्ग बंद पडले होते. त्यामुळे पिंगळे कुटुंबीयांनी पहलगाम येथेच थांबून तेथून दुसऱ्या दिवशी वैष्णोव देवी येथे जाण्याचा निर्णय घेतला.
ढगफुटी आणि झालेल्या भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी काही स्थानिक व्यावसायिक, विक्रेते याठिकाणी आता काही गडबड होण्याची शक्यता आपसात चर्चा करताना व्यक्त करत होते. काश्मीर परिसरातील प्रचंड सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची प्रत्येकाच्या हालचालींवर करडी नजर, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमधील चर्चेला विशेष महत्व नव्हते. काश्मीरच्या पहलगाम परिसरात जागोजागीची सुरक्षा व्यवस्था पाहिल्यावर तेथे हल्ला किंवा दुर्घटना घडेल असे कधी मनात येत नाही. तेथील पर्यटक पूर्णपणे सुरक्षेच्या कड्यात सुरक्षितपणे फिरत असतो, असे मानस पिंगळे यांनी सांगितले.
इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना आम्ही बैसरन टेकड्यांवर जाऊन आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या जागेवर दहशतवाद्यांकडून हल्ला होतो. पर्यटकांना जीवे ठार मारले जाते, हे अनाकलनीय आहे. प्रत्येक पाॅईंटला तेथे विविध कॅडरचे सुरक्षा जवान तैनात होते. त्यामुळे घनदाट जंगल, बर्फाचे डोंगर किंवा दऱ्या-खोऱ्यांतून तेथे सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून कोण आले हे काही समजण्यास वाव नाही. पर्यटक तेथे निसर्गसौंदर्यांचा आस्वाद घेत असताना कुटुंबीयांसमोर सदस्याला दहशतवाद्यांकडून ठार मारले जाते, हे अतिशय निंदनीय असल्याचे मत मानस पिंगळे यांनी व्यक्त केले.
ढगफुटी, भूस्खलन आणि त्यानंतर पहलगाम बैसरन टेकड्यांवरील दहशतवादी हल्ला, या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या गोंधळलेल्या वातावरणामुळे आपण वैष्णोदेवीचा दौैरा रद्द करून श्रीनगर येथून डोंबिवलीला परतणे पसंत केले. काश्मीरमध्ये असतानाच भयंकर हल्ल्याची घटना घडल्याने कोणतेही आव्हान न स्वीकारताना आपण कुटुंबीयांसह माघारी परतणे सोयीस्कर असल्याचा विचार केला. काश्मीर हे भारताचे नंदवनच आहे. प्रत्येक माणूस तेथे सुरक्षित आहे. पण हे का घडले ? याचे खोलवर ठोस उत्तर शोधावेच लागेल, असे मानस पिंगळे म्हणाले.