एका अस्वस्थ बदलापूरकराची कहाणी

बदलापूरकरांच्या मनात नेमके काय याची मांडलेली मनोव्यथा
बदलापूर
बदलापूर संतप्त नागरिकांची गर्दीfile photo
Published on
Updated on
बदलापूर : पंकज साताळकर

माझ्या शहराला अनेक विशेषणांचा अभिमान आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडे बदलणारं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीच अध्यक्षपद भूषवून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, सह्याद्रीच्या कुशित, मुळगांवचा खंडोबा आणि कोंडेश्वरच्या सुप्रसिद्ध धबधब्यांची ओळख असलेलं माझं शहर..बारावी धरणाच्या समोर असलेलं माझं शहर...गरीब, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांंना राहण्यासाठी सुसंस्कृत, शांत, असलेलं माझं शहर बदलापूर या सार्‍यांचा मला अभिमान असतो आणि तो मी नेहमी गर्वाने बाळगत असतो.

पण...सिस्टीमच्या दबावाखाली आम्ही सगळं सहन करतो. आमच्याकडे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण महाराष्ट्रातल्या अति दुर्गम भागापेक्षाही अधिक आहे. पण हे माझं शहर म्हणून आम्ही सहन करतो. पाण्यावरून तिसर महायुद्ध होईल असं ऐकतो, त्याचा अनुभव आम्ही क्षणाक्षणाला घेतो. मूलभूत सोयींसाठीही आम्हाला झगडावं लागतं. आम्ही त्या काही प्रमाणात मिळवतो आणि शांततेत जीवन जगतो. रेल्वे स्टेशन पासून काही किलोमीटर अंतरावर आयुष्याची सगळी कमाई लावून घर घेतो. स्टेशन किंवा घर गाठण्यासाठी पाच आणि दहा रुपयांवरून रिक्षावाल्यांची घासाघासी नाही केली तर प्रवास तरी कुठे पूर्ण होतो.

स्टेशनला आल्यावर पार्किंगचं सोडा ओ, स्टेशनमध्ये शिरायलाही आम्हाला जागा मिळत नाही. पण गाडी मात्र आम्ही वेळेवर पकडण्यासाठी हजर असतो. लोकलचं वेळापत्रक असतं ? आणि ते अस्तित्वात असतं याचं आणि आमचं काही नातच नसतं. कोणीही यावं आणि टपलीत मारून जावं. तशीच आमची अवस्था. गर्दीच्या वेळेसही अर्ध्या ते पाऊण तासाला मुंबईच्या दिशेने लोकल सुटतात. आम्ही जनावरांनाही लाजवेल अशा अभिमानाने बदलापूरचे प्रवासी आहोत असं सांगतो. आणि प्रवास करतो. गोल्ड मेडल मिळवण्यासाठी धावपटूच्या वेगाने ऑलिंपिकमध्ये धावतो, अशा सार्‍यांचे रेकॉर्ड आम्ही कर्जतकडून मुंबईकडे जाणारी गाडी आली की क्षणाक्षणात मोडतो. अर्थात जीव मुठीत असतो आणि दैव बलत्तर असतं आमचं, हे सगळं घडतं त्या रेल्वे स्टेशनवर जेथे मी राहतो ते माझं शहर असतं. एमआयडीसीचं प्रदूषण, कारखान्यांमध्ये स्फोट, त्यातून आमच्या घरांवर वस्तू कधी कुठीन पडून काहीही संबंध नसताना कुटुंबप्रमुखांना जीव गमावा लागतो. पण सगळं शांत असतं. आरोग्य यंत्रणा, सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधींकडे अपेक्षा आमच्या नाही. आम्ही राहतो या शहरात फक्त जीवन जगण्यासाठी. का तर हे आमचं बदलापूर शहर आहे.

‘बदला’पूर

प्रत्येकाच्या मनात असते लेक लाडकी

विश्वाचाही दीप उजळते लेक लाडकी

आभाळाला तिने जिंकले अनेकदा पण

दुःखाच्या यानातुन फिरते लेक लाडकी

सरकारी योजना कितीही आल्या गेल्या

लाल फितीच्या आत अडकते लेक लाडकी

दिवसाढवळ्या चाकू घुसतो पोटामध्ये...

रस्त्यावरची जनता बघते लेक लाडकी

रिंकू पाटील, यशश्री शिंदे, असो निर्भया

नराधमांना कुठे समजते लेक लाडकी?

ओक्के, खोक्केवाले आता कुठे पळाले ?

सत्तेच्या स्पर्धेत हरवते लेक लाडकी !

अखेर ’बदला’ घेत

उसळला ’पूर’ चीडीचा

लढण्यासाठी पुन्हा जन्मते लेक लाडकी

पुरुषत्वाची मलाच माझ्या लाज वाटते

ठेचुन काढीन खुशाल म्हणते लेक लाडकी

रक्षाबंधन कसले करता भावांनो रे......

डोळ्यातदेखत कुणीही लुटते लेक लाडकी

- माधव डोळे

जीवन जगण्यासाठी सुख सोयी सुविधा हव्यात. पण मूलभूत गोष्टींमध्ये आम्ही समधानी असतो. आम्ही अस्वस्थ नसतो, अशांत नसतो, उग्र नसतो, हिंसक तर मुळीच नसतो हो, सुसंस्कृत असतो, शोषित असतो, सामावून घेत असतो, समजुन घेत असतो. का तर मी एक अस्वस्थ बदलापूरकर असतो.

म्हणून काय तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत बघता ? मुल बाळं सोडून आम्ही कामाला गेल्यानंतर तुम्ही अशी वागणूक देता. बाकी सगळं सोडा हो, आम्ही जीवन जगण्याचा मूलमंत्र बदलापूरात राहून शिकलोय सगळ्या गोष्टी. आम्ही ऍडजेस्ट करू वीज, पाणी आणि रस्ते. या गरजा शुल्लक आहेत आमच्यासाठी. असेल त्यात जीवन जगायची तयारी ज्यांची आहे ना तो खरा बदलापूरकर.

पण तुम्ही आमच्याशी गफलत केली. आमच्या चिमुरड्यांना तुम्ही लक्ष्य केलं. शाळा व्यवस्थापन, पोलीस यांनी आमच्या चिमुकल्यांची हेळसांड केली. झालेली हेळसांड व्यथित मनानं जगासमोर आली. असंतोष मनात असतो, तो खदखदत असतो, पण उफाळून येण्यासाठी सिस्टीमने आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचीच खेळ मांडला आणि सिस्टीमनेच आम्हाला रस्त्यावर आणलं. आमच्या इभ्रतिला आणि आमच्या मुला बाळांच्या, आया, बहिणींच्या अब्रूवर जर तुम्ही चाल कराल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही या बदलापूर शहरात राहूनच आमच्या नसानसात

भिनवला आहे. बदलापूरकर अस्वस्थ अनेक कारणांनी आहेत. वाट करून द्यायला त्यांना कोणी घरी बोलवायला गेलं नव्हतं. ती माझी मुलगी आहे ही एक भावनाच आमच्या बदलापूरकरांच्या एकीसाठी खूप मोठी होती. वरील कोणत्याही मुद्द्यावर आम्ही कदाचित राजकारण, समाजकारण, जात, पात, धर्म,भाष यात विभागलो गेलो असतो. पण आमच्या मुलाबाळांच्या अब्रूवर तुम्ही हात घातलाच तर काय होतं हे दाखवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news