

डाेंबिवली ( ठाणे ) : कल्याण-नगर महामार्गावरील शहाडच्या उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असून या मार्गावरील वाहतूक ही १५ दिवस बंद असूनही दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने वाहनांचे चालक, प्रवासी आणि वाहतूकदार संतप्त झाले आहेत.
कल्याण-नगर हा ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडला जाणारा महत्वाचा महामार्ग मानला जातो. या महामार्गावरील शहाडच्या उड्डाण पुलाची दुरवस्था झाली आहे. दुरूस्ती न झाल्याने या पुलावरील रस्त्याची चाळण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने १५ दिवस हा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवला होता. तथापि अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.
कल्याण-नगर मार्गावर या पुलावर नेहमीच खड्ड्यांचे साम्राज्य असते. पावलोपावली पडलेले खड्डे आणि डांबर उखडल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल विविध राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी दुरुस्तीच्या मागणीसाठी वारंवार आंदोलने केली आहेत. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात हा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवून काम सुरू केले होते. मात्र २६ ऑक्टोबरपर्यंत काम अपूर्ण असून रस्त्याची अवस्था पूर्वर्वीपेक्षा अधिक बिकट झाल्याचे चित्र दिसत आहे.
रॅप साँगने काढले वाभाडे
शहाड उड्डाण पुलाची तंतोतंत दुरवस्था एका तरुणाने रॅप साँगद्वारे चव्हाट्यावर आणली आहे. या तरुणाने पुलावर चित्रीकरण करून प्रशासनाला आरसा दाखवला आहे. या रॅपमध्ये तो म्हणतो, पंधरा दिवसांत शहाडचा ब्रिज बनवणार म्हणाले, पण दिवाळीचे चॉकलेट आम्हाला दिले. या रॅप साँगमधून या तरुणाने सत्य परिस्थिती मांडली असून गाण्याच्या ओळीतून त्याने या पुलाची व्यथा मांडली आहे. नागरिकांचा आवाज म्हणून हे साँग तयार केलेले आहे.
कामाला गती मिळत नसल्याने नाराजी
सद्या शहाड उड्डाणपुलाचे काम पूर्ण न होणे, त्यावरील रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष, या तिन्ही गोष्टींचा मिलाफ रॅप साँगमध्ये आहे. या माध्यमातून शहाड उड्डाण पुलाकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. याहून भयानक परिस्थिती कल्याण-मुरबाड रोडची झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने प्रवासी, वाहनचालक, वाहतूकदारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.