ठाण्यातील श्रींच्या मूर्ती निघाल्या सातासमुद्रापार

अमेरिका, इंग्लंड, जपानमध्ये इको-फ्रेंडली गणेशाला मोठी मागणी
pudhari
मूर्तीकार प्रसाद वडके यांनी घडविलेल्या गणेशमूर्तीpudhari news network
ठाणे : श्रद्धा कांदळकर

दिवसेंदिवस परदेशात गणेशोत्सव अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले किंवा काही वर्षांकरिता परदेशात गेलेले मराठीजन गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. गणेशोत्सवासाठी दर वर्षी ठाण्यातून परदेशात मूर्ती पाठवल्या जातात. यंदाही ठाण्यातील विक्रेत्यांनी तयार केलेल्या जवळपास 5 हजाराहून अधिक श्रींच्या इको फ्रेंडली मूर्ती अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांमध्ये पाठवण्यात आल्याचे मूर्तिकार प्रसाद वडके यांनी सांगितले.

Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे आणि वर्षा येथील निवासस्थानी मूर्तीकार प्रसाद वडके यांनी घडवलेल्या श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या देशात मराठी नागरिक कामानिमित्त मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. मात्र तिथे राहत असताना हे नागरिक संस्कृती, परंपरा जपत, प्रत्येक सणवार साजरे करताना दिसतात. अशातच गणेशोत्सव साजरा करणार्‍या नागरिकांची संख्याही मोठी आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाण्यातील अनेक विक्रेते स्वतःच्या हाताने तयार केलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती अमेरिका,जपान तसेच कॅनडा येथे पाठवतात. या मूर्त्यांना परदेशात मोठी मागणी आहे. मूर्तिकार प्रसाद वडके हे ठाण्यातील पातलीपाडा येथे राहतात. जवळपास गेल्या नऊ वर्षापासून ते विविध देशात आपल्या गणपती मूर्ती पाठवत आहेत. कोविडनंतर त्यांच्या व्यवसायाला अधिक चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सगळ्यात मोठी असलेली पाच फुटी मूर्ती त्यांनी 60 हजार रुपयाला अमेरिकेला पाठवली आहे. ही मूर्ती त्यांनी बोटीने पाठवली असून गुजरात पोर्ट वरून या मूर्ती ट्रान्सपोर्ट केल्या जातात. नेदरलँडला पाठवलेल्या मूर्ती जेएनपीटी पोर्टवरून पाठवण्यात येते असे त्यांनी सांगितले.

मूर्ती पोहोचविताना विशेष काळजी

परदेशात पाठवल्या जाणार्‍या सर्व मूर्ती इको फ्रेंडली आहेत. या मूर्ती बोटीने पाठविल्या जातात. शाडू आणि कागदापासून बनवलेल्या असल्याने त्या नाजूक असतात. त्यामुळे एक्सपोर्ट करताना बबल रॅपिंग, बॉक्स यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करावी लागते. या मूर्ती अमेरिकेत पोहचण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतात. अमेरिकेत मूर्ती हवी असेल तर त्याची बुकिंग जानेवारी- फेब्रुवारीपासून घेतली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news