डोंबिवली : आई-वडिल गावी गेल्याची संधी साधून पश्चिम डोंबिवलीतील चिंचोड्याचा पाड्यात राहणार्या एका 29 वर्षीय बेरोजगार तरूणाने आपल्या वृध्द आई-वडिलांनी जपून ठेवलेल्या 2 लाख 85 हजार रूपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे.
पोटच्या मुलानेच घरच्या तिजोरीतील पैश्यांसह बँक खात्यात जमा केलेल्या आई-वडिलांच्या पैशांची चोरी केल्याने पोलिसही या प्रकाराने अचंबित झाले आहेत. विनायक प्रभाकर माने (29, रा. गंध पद्मिनी सोसायटी, चिंचोड्याचा पाडा, सुभाष रस्ता, डोंबिवली) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या संदर्भात चंद्रकला प्रभाकर माने (60) यांनी मुलाच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायकची आई चंद्रकला या गृहिणी आहेत. परिसरात घरकाम करून मिळणार्या उपजीविकेतून त्या घरगाडा चालवितात. त्यांचे पती सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे राहतात. प्रकृती ठीक नसल्याने तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पतीच्या प्रकृतीची खुशाली घेण्यासाठी चंद्रकला माने या मे महिन्यात कणकवली येथे गेल्या होत्या. तेथून डोंबिवलीत परतल्यावर चंद्रकला यांनी घरातील लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील रक्कम तपासली. तिजोरीत त्यांना काहीही आढळले नाही. त्यांनी मुलाला तिजोरीतील 35 हजार रूपये कुठे गेले, अशी विचारणा केली असता त्याने आपणास काही माहिती नसल्याची उत्तरे दिली. घरात चोरी झाली नसताना पैसे गेले कुठे ? असा प्रश्न चंद्रकला यांना पडला.
संशय आल्याने चंद्रकला यांनी पतीचे तिजोरीत असलेले पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम कार्ड तपासले. तेही जागेवर नव्हते. चंद्रकला यांनी बँकेत जाऊन पतीच्या बचत खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची विचारणा अधिकार्यांकडे केली. तेव्हा त्यांना 16 ते 21 जून दरम्यानच्या कालावधीत या बँक खात्यामधून एटीएममधून डेबिट कार्डच्या सहायाने वेगळ्या व्यवहारांमधून एकूण 2 लाख 50 हजार रूपये काढल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून चंद्रकला पुरत्या हादरल्या.
आपल्या मुलाशिवाय हे व्यवहार दुसरे कोणी करू शकत नाही, याची खात्री चंद्रकला यांना पटली. घरच्या तिजोरीतील 35 हजार रूपये आणि बँकेतील 2 लाख 50 हजार रूपये मुलगा विनायक यानेच लबाडी करून चोरल्याचे लक्षात आल्यानंतर, तसेच मुलगा याबद्दल खरे बोलण्यास तयार नसल्याने आई चंद्रकला माने यांनी मुलाच्या विरोधात तक्रार देण्याचे ठरविले. माता-पित्याला या वयात फुलासरखे जपण्याऐवजी त्यांना यातना देणार्या या दिवट्याचा प्रताप ऐकून पोलिस काही काळ अवाक् झाले होते. या संदर्भात आईच्या तक्रारीवरून मुलगा विनायक याच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.