

ठाणे : डोंगराळ, दुर्गम, आदिवासी पाड्यातील रुग्णांची तपासणी, गाव भेटी, असांसर्गिक आजारांसाठी स्क्रिनिंग, गरोदर मातांची तपासणी असे विविध निकष लावून प्राप्त गुणांनुसार उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या मोबाईल युनिटने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा गौरव करण्यात आला.
तालुका एमएमयू
शहापूर 3
मुरबाड 3
भिवंडी 2
अंबरनाथ 1
कल्याण 1
एकूण 10
सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम काम करणारे जिल्हे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत उत्तम काम करणार्या संस्था, कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त लक्ष्य पूर्ण करणारी रुग्णालये, जास्तीत जास्त प्रसूती करणार्या आरोग्य संस्था, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणारे जिल्हे, अश्या आरोग्य विभागातील विविध योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या संस्था आणि जिल्ह्यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त गौरविण्यात आले.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग तसेच मोबाईल मेडिकल युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत 10 मोबाईल व्हॅन कार्यरत असून, याद्वारे ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या सामान्य आजारांवर उपचार करणे, रक्त व लघवीच्या चाचण्या, जनजागृती करणे अशी सेवा या युनिट्सवर दिली जात आहे. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी विशेष तपासण्या घेतल्या जातात. ही व्हॅन ठराविक वेळापत्रकानुसार गावागावात जाऊन मोफत आरोग्य सेवा देते.