

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा महिलांच्या वाट्याला येणार आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जि. प. अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून, ठाणे जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित केले आहे. यामुळे जि.प.ची सत्ता महिलांच्या हाती जाणार हे स्पष्ट झाले आहे. (Latest Thane News)
ठाणे जि. प. सभागृहाची मुदत 2022 मध्ये संपली होती. त्यानंतर कोरोना, ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर प्रक्रिया आदी कारणाने वेळेवर निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिणामी, गेल्या साडेतीन वर्षांपासून जि.प.चा कारभार प्रशासकीय ताब्यात आहे. या काळात जि.प.चे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेकडे असून, राजकीय नेतृत्वाच्या अनुपस्थितीने जनतेच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची नाराजी काही वेळेस व्यक्त होत होती.
यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव होते. यंदा पुन्हा महिलांसाठीच अध्यक्षपद राखीव ठरल्याने महिला नेतृत्वाची परंपरा कायम राहणार आहे.
जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित केले आहे. पंचाय समित्यांची अनुसूचित जमाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 1, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1 आणि महिला राखीव 1 असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रमुख पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली होती. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आणि वेगवेगळ्या पक्षांतील फूट, नव्या आघाड्यांमुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे.