ठाणे : प्रत्येकाने निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी पूर्ण करावी. जबाबदारीने काम करावे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व परिपत्रकांचा व्यवस्थित अभ्यास करून सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत समिती सभागृहामध्ये संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाची आव्हाने अधिक असणार आहेत. अधिक काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी आपली तयारी परिपूर्ण असावी. उपलब्ध मनुष्यबळाचा पूरेपूर व योग्य वापर करावा. सर्वांनी मिळून एकत्र काम करा आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज यशस्वीपणे पार पाडा, असे सांगत त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जलजीवन अभियान अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम संजय जाधव, नवी मुंबई उपजिल्हाधिकारी आंतराष्ट्रीय प्रभावित क्षेत्राच्या सुकेशिनी कांबळे-पगारे, दीपक क्षीरसागर, संदीप माने, महेंद्रकुमार मेटकरी, सुनील महाले, विकास गजरे, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, शरद भगवान पवार, संजय भोसले, भालचंद्र बेहेरे, नरेंद्र भामरे, दिलीप सूर्यवंशी, वैजनाथ बुरडकर, सत्यवान उबाळे, विकास पाटील, नारायण रजपूत, मनोज शिवाजी सानप, आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांचे स्वागत करून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीविषयी माहिती दिली. त्यांनी कुलकर्णी यांना ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी - कर्मचार्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही कामकाज जबाबदारीने उत्तमरित्या पार पाडले जाईल, या शब्दात आश्वासित केले. प्रस्तावना व आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले.