

डोंबिवली : भारतीय स्त्री जीवनातील वर्तमान वळणावर उभे राहून महिला कायदा, महिलांना घटनेने दिलेले हक्क, बालविवाह, लहान मुलांचे शोषण, आदींचे प्रबोधन व्हावे, यासाठी डोंबिवली महिला महासंघातर्फे कृतीशील कार्यक्रमाचे संयोजन करून स्त्रीशक्तीचा जागर केला. डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा तथा कार्यवाह जयश्री कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.22) रोजी महिलादिन संपन्न झाला. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा महिला व बाल विभागाच्या संरक्षण अधिकारी रेखा हिरे व बाल संरक्षण अधिकारी ॲड. पल्लवी जाधव यांची साथ मिळाली होती.
जयश्री कर्वे यांनी अतिथींचे स्वागत केले. संस्थेच्या कोशाध्यक्ष सुनिती रायकर यांनी महिला महासंघाच्या कार्याची माहिती सादर करून पुढील संकल्पना प्रास्ताविकातून विशद केली. तर संस्थेच्या उपाध्यक्षा नेत्रा फडके यांनी प्रमुख पाहुण्यांचा समयोचित परिचय करून दिला. त्यानंतर सई बने लिखित फिटे अंधाराचे जाळे हे पथनाट्य स्वरुपिणी मंडळाच्या महिलांनी सादर केले. हे पथनाट्य पाहून ठाणे जिल्हा महिला व बाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्रमात सादर करण्यासाठी आमंत्रण दिले.
ठाणे जिल्हा महिला व बाल विभागाच्या अधिकारी रेखा हिरे व ॲड. पल्लवी जाधव यांची जाहीर मुलाखत ॲड. तृप्ती राणे व सुलेखा गटकळ यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून घेतली. यावेळी बोलताना उभय अधिकारी म्हणाल्या, डोंबिवली महिला महासंघाने बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. आजच्या काळातही बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याने ते वेळीच रोखायला हवेत. याशिवाय लहान मुलांचा वापर गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी केला जात आहे. समाजात वाढत असलेल्या या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येक स्त्री आणि पुरूषाने जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यासाठीच शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविभागाची स्थापना करण्यात आली आहे. याखेरीज महिलांवर अन्याय, अत्याचार नेहमीच होत असतात. त्यासंदर्भात सजग राहणे गरजेचे आहे. डोंबिवली महिला महासंघाने बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी उपस्थित आधिकाऱ्यांनी केले.
महिला व बालकांसदर्भात सक्रिय योगदान दिले तर समाज निकोप राहून महिला सक्षमीकरण निश्चितच होईल. शासनाने महिलांसाठी चालू केलेल्या विविध योजनांची माहिती पण त्यांनी दिली. आतापर्यंत 42 बालविवाह रोखण्यासाठी या विभागाने पुढाकार घेतला आहे. महिला व बाल विभागातर्फे लहान मुलांची तस्करी रोखण्याचे मोठे काम आहे. बेकायदेशीर दत्तक या धोक्यापासून सावध रहा, असेही आवाहन त्यांनी केले. या मुलाखतीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक जनजागृती झाली.
अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर यांचा एकपात्री प्रयोग आरती मुनीश्वर यांनी सादर केला. त्यांचा परिचय मीना गोडखिंडी यांनी करून दिला. अहिल्याबाईंच्या जन्मापासून ते थेट राजकीय कारकीर्दीपर्यतचा जीवनपट आरती मुनीश्वर यांनी समर्थपणे उलगडून दाखवला. अहिल्याबाईंचे सामाजिक व राजकीय कार्य या विषयांना स्पर्श करीत त्यांनी अचूक शब्दफेक, वास्तववादी इतिहास अधोरेखित करत साक्षात अहिल्याबाई होळकर उभ्या केल्या.
डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्ष डॉ. विंदा भुस्कुटे महिला महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला. आरती मुनीश्वर व रेखा हिरे व ॲड. पल्लवी जाधव यांचा सत्कार डॉ. विंदा भुस्कुटे व जयश्री कर्वे यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया नायकर यांनी केले, तर पूजा तोतला यांनी उपस्थितांचे आभार मानले.