

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना पाणी पुरवठा करणार्या उल्हास नदीचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुढाकार सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आला होता.
उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या म्हारळ आणि कांबा या दोन गावांमधून या प्रकल्पाची सुरुवात होणार असून त्यासाठी या गावांमध्ये 6 कोटी 30 लाख 9 हजार 750 रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती. तथापि सहा वर्षे उलटूनही म्हारळ, मोहना, गाळेगाव, कांब्याचा नाला उल्हास नदीत सरळ जाण्यापासून रोखण्यात आला नाही. त्यामुळे कामे कधी सुरू करणार? आदी प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेकडून नदीसंवर्धन योजनेसाठी पाठवलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. नदीतील सांडपाण्याचा निचरा थांबवणे, सांडपाण्यासाठी प्रक्रिया यंत्रणा उभारणे, नदी काठावर स्वच्छतागृह बांधून त्याच्या सांडपाण्यासाठी मलशुद्धीकरण यंत्रणा उभारणे, नदी घाट विकास, काठावरील जमीनीची धूप रोखणे, नदीच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे, अशी कामे केली जाणार होती.
जिल्ह्याची जीवनवाहिनी उल्हास नदीचा विस्तार 5 जिल्हे, 17 तालुके, 6 महापालिका 1 नगरपालिका आणि 8 ग्रामपंचायतींच्या परिसरातून होत असून या गावांमधून अनेक प्रदूषित घटक नदी पात्रामध्ये सोडले जातात. त्यामुळे नदीची प्रतवारी घसरू लागली असून जलप्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. उल्हास नदीकाठावर वाढलेली कारखानदारी, नागरी वस्त्यांमुळे सांडपाणी आणि मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रदूषकांचा धोका व कचर्यामुळे उल्हास नदीत होणारे अतिक्रमण हा अत्यंत संवेदनशील प्रश्न झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या नदीच्या पाण्याचा वापर होत असल्यामुळे ही नदी स्वच्छ असणे महत्त्वाची गरज आहे. परंतु तरीही प्रदूषणकारी घटकांचा निचरा वाढत आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. वनशक्तीच्या माध्यमातून उल्हासनदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी व्यापक लढा सुरू असून महापालिकांकडून या नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दायित्व देण्यात आले. एकीकडे नदीच्या दुर्दशेविषयी चिंता व्यक्त केली जात असतानाच ठाणे जिल्हा परिषदेकडून पुढाकार घेऊन राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत नदीचा पर्यावरणीय विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. अद्याप या ठिकाणी कोणतीही सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीसह या भागातील रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उल्हास नदीतून पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व व पश्चिम विभागातील नागरिकांना पाणी वितरित करते. याच उल्हास नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. जलपर्णी मशिनद्वारे काढण्याचे काम सुरू आहे. जलपर्णीच्या मुळाशी असलेल्या गाळामुळे पाणी पिवळसर दिसत आहे. तसेच पाण्याला थोडासा वास येत आहे. तथापी पाण्याचा रंग पिवळसर असल्याने नागरिकांनी पाणी गाळून व उकळून वापरण्याची खबरदारी घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने केले आहे.