

शहापूर : राजेश जागरे
शहापुरातील ग्रामीण भागात भूगर्भातील पाणी पातळी खालावली असल्याने बोअरवेल व विहीरीतील जलस्रोत आटल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भिषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर येथील विहीर तसेच बोअरवेलच्या झर्यातून पाणी जमा होईपर्यंत महिलांना तासन तास ताटकळत पाण्याची वाट पहावी लागत आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा, मध्यवैतरणा ही जलाशय शहापुरात असतांना देखील याठिकाणी भिषण पाणी टंचाई जाणवत असुन धरण उशाला, कोरड घशाला अशी गंभीर परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे.
तालुक्यात जलस्वराज्य, भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल यासारख्या दोनशे योजना केवळ कागदावरच पुर्ण झाल्या असून सातत्याने या योजनेतून पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे सद्यस्थितीतील जल जिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करून अर्धवट अवस्थेत बंद आहेत. योजनांची कामाची मुदत सन 2023 मध्ये संपुष्टात आली असतांना देखील काही ठिकाणी ही कामे अतिशय धिम्यागतीने तर काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत.मात्र सर्व योजनांची कामे ही वनपरवानग्या, जागा निश्चित नसल्याने तसेच अपुरे कामांमुळे बारगळल्या आहेत.
तालुक्यातील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही काही योजनेचे काम अर्धवट अवस्थेत ठप्प झाले असल्याने जलजीवन योजनेच्या ‘हर घर जल’योजनेलाच घरघर लागली असल्याने ही योजनाच पूर्ण होत नसल्याने ठिकठिकाणी स्थानिक रहिवाशांना तिव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने महिलावर्ग संताप व्यक्त करीत आहेत.बिल मिळत नसल्याने अंतिम टप्प्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यास ठेकेदार टाळाटाळ करीत असून अधिकारी वर्गही हताश झाला आहे. ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी जलजीवन योजनेची कामे घेतली आहेत त्यांची कामांसाठी उसने पैसे घेतल्याने व दागिने गहाण ठेऊन कामे केल्याने आर्थिक कोंडी झाल्याने ते हवालदिल झाले असून शासनाने कामाचे बिल लवकरात लवकर अदा करावे यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे हेलपाटे मारून हैराण झाले आहेत. दरम्यान सद्यस्थितीत 11 पाडे व 35 गावांना 15 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जशी मागणी वाढेल त्याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल व भावली पाणीपुरवठा योजनेवर जलजीवन मिशनच्या 119 योजना मंजूर असून त्यापैकी 21 पूर्ण झाल्या आहेत तर 93 योजनांचे काम प्रगतीपथावर असून 5 योजना अजून तांत्रिक अडचणीमुळे सुरूच झाल्या नसल्याची माहिती शहापूर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या विजया पांढरे यांनी दिली.