डोंबिवली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्वेसह पश्चिमेकडील द्वारका चौकात पेढे आणि साखर वाटून डोंबिवलीकरांचे तोंड गोड करून जल्लोष करण्यात आला. यावेळी मनसेसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह मराठी भाषेचा गौरव करत घोषणाबाजी केली.
कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे म्हणाले, अमृतातेही पैजा जिंके, अशी बिरुदावली बाळगणाऱ्या माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरिता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आग्रही आणि सातत्यपूर्ण अशी भूमिका घेतली होती. तसेच महायुतीला पाठींबा देताना माझ्या काही अटी आहेत असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर देखील हे सांगितले होते. यानंतर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत कार्यवाही केल्याची प्रल्हाद म्हात्रे यांनी माहिती दिली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या बारा वर्षांपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेरीस यश आले असून केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केल्याने मराठी भाषेचा गौरव झाल्याची भावना शहराध्यक्ष राहूल कामत यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, शहराध्यक्षा मंदा पाटील, शहराध्यक्ष राहूल कामत, उपशहराध्यक्ष श्रीकांत वरांगे, राजू पाटील, प्रेम पाटील, शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे, विभागाध्यक्ष कदम भोईर, रितेश म्हात्रे, चेतन म्हात्रे, उप विभागाध्यक्ष आश्विन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मनसेसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.