

डोंबिवली : पर्यावरण दक्षता मंच, उर्जा फाऊंडेशनच्या, विवेकानंद सेवा मंडळ आणि लक्ष्मी नारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.22) रोजी आयोजित केलेल्या जल सुरक्षा दिंडीमध्ये टिळकनगर विद्यामंदिर, स. है, जोंधळे विद्यालय आणि स. वा. जोशी विद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने ही दिंडी पार पडली. पाणी या नैसर्गिक संसाधनाचे महत्व याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसह शेकडो डोंबिवलीकरांनी या दिंडीत सहभाग घेतला.
जल सुरक्षा दिंडीमध्ये विवेकानंद सेवा मंडळाच्या स्वच्छ डोंबिवली अभियानचे अनिल मोकल व त्यांचे सहकारी, पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवलीच्या रूपाली शाईवाले आणि त्यांचे सहकारी, तसेच ऊर्जा फाऊंडेशनच्या मेधा गोखले, स्नेहल दीक्षित आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
जागतिक जल दिनानिमित्ताने पाण्याचे महत्त्व आणि त्याचा जपून वापर करण्यासाठी आवाहन केले जाते. यंदाच्या जागतिक जल दिनासाठी हिमनदी संवर्धन ही संकल्पना घेतली गेली आहे. त्यानिमित्ताने गोड्या पाण्याच्या साठयांचे महत्त्व आपण सर्वानी जाणून घेतले पाहिजे. आपल्या पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगितले.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. प्रत्येकाने जाणीवपूर्वक पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न करावा आणि परिसरातील जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखावे यासाठी पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी सर्व उपस्थितांना देण्यात आली. तिन्ही शाळांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत, पाणी बचतीचा संदेश देत फडके रोड वरील श्री गणेश मंदिर संस्थान येथे एकत्र आले. श्री गणेशाला वंदन करून पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोहिणी लोकरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पर्यावरण विभाग प्रमुख यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. तत्पूर्वी श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी यांनी गाण्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे यांनी गणेश मंदिराच्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.