

शहापूर : मुंबईला पाणीपुरवठा करणारी भातसा, तानसा व मोडकसागर ही धरणे शहापुरात आहेत. मात्र येथील खेड्यापाड्यात आजही पाणीटंचाई कायम आहे. त्यावर शासन दरवर्षी करोडो रुपये खर्च करते; मात्र दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गाव-पाडे वाढतच आहेत.
भावली पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु अपूर्ण अवस्थेत असून तिचे काम बंद आहे.जलजीवन योजना राबवूनही पाणीटंचाई दूर होत नसल्याने महिला दरवर्षी पाण्यासाठी वणवण करतात. बसपोर्ट, प्रशासकीय भवन व क्रीडा संकुल यासारख्या लक्षणीय विकासकामे दुर्लक्षित केल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. पावसाळ्यातही ग्रामीण भागात कुठलेही नियोजन दिसून येत नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती नाही.
जिथे आहेत त्या नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही.त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहते.गटारी कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहाते.एकंदरीत सर्वच थरातून नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
शहापूर तालुक्यात असणारे समुद्धी महामार्गाबाबत शेतकर्यांच्या अडचणींचा प्रश्न, बिगर आदिवासीवरील अन्यायकारक कायदा,शाई धरण विरोध,मूम्बरी धरण शेतकरी संघर्ष,तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, 35 सेक्शन कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन,शहापुरातील वहातुक कोंडी,वैद्यकीय महाविद्यालय या समस्या आजही कायम आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी आश्वासनापलीकडे काहीही करत नसल्याने मतदार नाराजी व्यक्त करीत आहेत.
रेल्वेच्या समस्या,बेरोजगारी, आरोग्य व शैक्षणिक समस्या,हे विषय कळीचे मुद्दे असणार आहेत. हे प्रश्न कोणता उमेदवार सोडविण्यासाठी काय प्रयत्न करतो यावर मतदारांचे लक्ष असेल. तालुक्यात वासिंद, आसनगाव व आटगाव येथे एमआयडीसी असूनही कारखान्यांना वीजपुरवठा सुरळीत नसल्याने 60 टक्के कंपन्या बंद आहेत.येथील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी ठाणे,कल्याण, भिवंडी येथील गोदामांमध्ये 7 ते 8 हजार रुपये महिना पगार घेऊन कामाला जावे लागते. शहापूर तालुक्यात रोजगाराचे साधनच उपलब्ध होत नसल्याने अनेक घरात बेरोजगार हातावर हात ठेवून बसले आहेत.तर काही नाईलाजास्तव कमी पगारावर कामाला जात आहे.