

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये लवकरच प्रस्तुतीसाठी २० खाटांचा तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी १० खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याचे पालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदारांशी झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले
उल्हासनगर महानगरपालिकेच्या शहाड- मुरबाड रोड येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कामाचा व तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सनियंत्रण समितीची बैठक उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
रुग्णालयात तक्रार पेटी नसणे, बाऊन्सर अयोग्य बोलत, तपासणी न करता रुग्णांना दाखल करणे, महापालिकेचा एकही कर्मचारी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपस्थित नसणे, सायंकाळनंतर तातडीच्या रुग्णांना दाखल न करणे, रात्रीच्या वेळी शिक्षण घेणारे विद्यार्थी उपचार करतात अश्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. डॉक्टरांना जबाबदारी देण्यासह इतर अनेक मुद्यांवरून पालिका प्रशासनाला आमदारांनी धारेवर धरले. त्याचबरोबर कोविड कालावधीत कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणीही आमदार कुमार आयलानी यांनी केली होती. परिसरात मात्र त्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या बैठकीत उपरोक्त विषयांनुसार चर्चा करण्यात आली. त्यात रुग्णालयातील तक्रार पेटी, बाऊन्सरच्या जागी सुरक्षा रक्षक, महापालिकेतर्फे डॉ. कीर्ती यांची नियमित नियुक्ती, रुग्ण व कुटुंबीयांशी बोलण्यात योग्य पद्धतीचा अवलंब करणे आदी बाबी मान्य करण्यात आल्या.
हॉस्पिटलच्या शेजारी डायलिसिस सेंटर, चिल्ड्रन वॉर्ड, पेडियाट्रिक्स, मॅटर्निटी वॉर्ड, एमआरआय मशिन आदींची तातडीने व्यवस्था करण्याचे मान्य करण्यात आले. रुग्णालयासाठी लवकरच रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये यासाठी डॉक्टर, महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, याशिवाय ज्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे त्यांची तपासणी करून महापालिका व अश्या लोकांना मोफत उपचार दिले जावेत, अशी मागणी यावेळी आमदारांनी केली. त्याला आयुक्त विकास ढाकणे यांनी सकारात्मकता दाखवली.
या आढावा बैठकीला आमदार कुमार आयलानी, आमदार बालाजी किणीकर, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप आयुक्त डॉ. विजय खेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती किलजे, सल्लागार डॉ. सचिन वाघ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, डॉ. संजित पॉल आदी कर्मचारी उपस्थित होते