नेवाळी : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असल्याने डायघर ग्रामस्थांची घर आणि घराच्या परिसरातील स्वच्छता केली आहे. मात्र ठाणे मनपाने निर्माण केलेल्या कचर्याच्या डोंगरामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याने यंदा डायघर ग्रामस्थांचा गणेशोत्सव ठाण्याच्या कचर्याच्या डोंगराखालील दुर्गंधीत होणार आहे. त्यामुळे ठाणे मनपा या दुर्गंधीवर किमान गणेशोत्सव कालखंडात तरी मात करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठाण्यातील कचर्यापासून डायघर गावात वीज निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रकल्प मनपाने सुरू केला आहे. मात्र या प्रकल्पात वीज निर्मिती न करता ठाणे मनपाने दुर्गंधीचे डोंगर तयार केले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड डासांचा आणि दुर्गंधीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गावात गणेशोत्सवासाठी इतर गावातील भक्त देवदर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे गावात येणार्या पाहुण्यांना गावातील दुर्गंधीच्या निर्माण झालेल्या डोंगराचे दर्शन आणि दूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
ठाण्याच्या कचर्याच्या दुर्गंधीमुळे डायघर ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी स्वतः बैठक घेऊन मागण्यांंवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांनी
18 ऑगस्ट रोजी आपल्या दालनात बैठक घेऊन ग्रामस्थ व ठाणे मनपाची समस्याच जाणून घेतल्या होत्या. यावेळी ठाणे मनपाच्या कारभारावर जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी नाराजी देखील बैठकीत व्यक्त केली होती. तर दुर्गंधी, कचर्याचे विभाजन, दूषित पाण्याचे व्यवस्थापन, रस्त्यात पडणारा कचरा यांचे योग्य नियोजनाचे आदेश बैठकीत दिले. मात्र डायघरमधील कचर्यामुळे निर्माण झालेल्या अशा भल्या मोठ्या डोंगरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
डायघरमधील कचराप्रश्नी स्थानिक आमदार आणि ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांची सोमवारी (दि.2) भेट घेतली आहे. यावेळी डायघर मधील कचर्याचे निर्माण झालेले डोंगर देखील आयुक्तांना दाखविण्यात आले आहेत. आयुक्तांनी कचर्याचे डोंगर पाहिल्यानंतर स्वतः डायघर प्रकल्पाला भेट देण्याचे आश्वासन ग्रामस्थ व आमदार पाटील यांना दिले आहे.