

खोडाळा : मुंबई- नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा कसारा घाटातून मार्गस्थ होणारा राष्ट्रीय महामार्ग मोखाडा तालुक्यातून मुंबईकडे प्रस्थान करणार्या शेकडो वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी मागील पाच वर्षात असंख्य अपघात घडले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत.याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने जरूर ती उपाय योजना करण्याची मागणी मोखाडा तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.
मुंबई- नाशिक दृतगती राष्ट्रीय महामार्ग हा कसारा घाटातून जाणारा एकेरी महामार्ग आहे. या मार्गांवरून मोखाडा, खोडाळा येथून ठाणे, मुंबई येथे कार्यालयीन व दवाखाण्याच्या कामासाठी जाणार्या खाजगी व परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहनांसाठी (विहीगाव) जव्हार फाटा ते लतीफवाडी पर्यंतचा चार किलोमीटरचा मार्ग हा अत्यंत धोकादायक झालेला आहे. मुंबईकडून येणारी वाहनेही सदरचा मार्ग हा एकेरी असल्याने भरधाव वेगाने मार्गक्रमन करतात.त्यातच मुंबईकडून नाशिककडे जाणारी अवजड वाहनेही शेजारून जाणार्या वाहनांना वळसा घालून पुढे त्याच वेगाने जात असल्याने विहिगाव फाट्यावरून कसार्याकडे (समोरून) धावणारी वाहनेही जात असल्याने त्या वाहणांना मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी घडणार्या घटना घडत आलेल्या आहेत. (विहिगाव) जव्हार फाटा ते लतीफवाडी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गांवर मोखाडा खोडाळा येथून मुंबईकडे जाणार्या वाहनांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्ता दुभाजक टाकल्यास वाहणांना सोईचे होणार असून संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकते.