Thane News | उसाटणे येथील पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये थेट पाणीच!, अनेकांची वाहने पडली बंद!

 वाहनचालकांकडून उसाटणे पेट्रोल पंपावर संताप, इंधन भरलेल्यांना पैसे परत देणार
Thane News | उसाटणे येथील पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये थेट पाणीच!, अनेकांची वाहने पडली बंद!
Published on
Updated on

नेवाळी : खोणी - तळोजा महामार्गावरील अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर मंगळवारी सायंकाळी पेट्रोलमध्ये पाणी मिसळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पेट्रोल भरल्यानंतर अनेक दुचाकी काही अंतरावरच बंद पडल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली होती. या घटनेमुळे संतप्त वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेत जाब विचारत मोठी गर्दी केली होती. मात्र प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंपावरील पेट्रोल विक्री बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. खोणी - तळोजा महामार्गालगत असलेल्या या पेट्रोल पंपावर परिसरातील कामगार, प्रवासी तसेच दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी येतात. अनेक वाहनचालकांनी पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावरच त्यांच्या दुचाकी बंद पडल्याचे लक्षात आले आहे. सुरुवातीला वाहनातील बिघाड असल्याचे समजून काहींनी वाहन दुरुस्तीचा प्रयत्न केला. मात्र परिसरात एकामागोमाग अनेक वाहने बंद पडू लागल्याने संशय निर्माण झाला आहे.

यानंतर वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर जाऊन इंधनाची तपासणी करण्याची मागणी केली. तपासणीदरम्यान पेट्रोलसोबत पाणीही येत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा वाहनचालकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पेट्रोल पंप परिसरात गर्दी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडून संबंधित वाहनचालकांनी भरलेल्या इंधनाची सीसीटीव्हीच्या आधारे पडताळणी करून ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना भरलेल्या पेट्रोलची रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण असून इंधनाच्या गुणवत्तेबाबत संबंधित विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news