डोंबिवली : डोळखांब जवळील आदिवासी पाड्यांमध्ये फराळ वाटप करून डोंबिवलीकरांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील स्वातंत्र्यवीर राजगुरू माध्यमिक विद्यालय (साकडबाव), साकडबाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय (कोळीवडी), कातकरी वाडी (जांभुळवड), पायरवडी, पडवळ पाडा, आदी परिसरात आबालवृद्धांसह दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
डोंबिवलीतील माऊंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली अर्थात मॅड (MAD - Make A Difference) या संस्थेतर्फे रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ न्यू डोंबिवली या संस्था व अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने जवळपास एक हजार बाळगोपाळ आणि आदिवासींना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्या समवेत सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. दिवाळी असो वा कोणताही सण असला तरी आदिवासी आणि दुर्गम भागातील रहिवाशांना या सणांचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे डोंबिवलीकरांनी एकत्र येऊन आदिवासी आणि दुर्गम भागात जाऊन तेथील आदिवासी समाजा समवेत दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला.
यावेळी आदिवासी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. हा उपक्रम सातत्याने सहाव्या वर्षी राबवत असताना यंदा यशवंती हायकर्सचे ज्येष्ठ गिर्यारोहक पद्माकर गायकवाड तसेच मॅडचे संस्थापक अध्यक्ष सतीश गायकवाड, नामवंत गिर्यारोहक अनिल चव्हाण, रॉकी बोडके, दिलीप भगत, भूषण ठाकूर, विशाखा तांबे पांचाळ, कृपाली उचिल, मनोज हरड, कपिल पुजारी यांचा सहभाग होता. रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवलीचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, रोट्रॅक्टच्या अध्यक्षा ऋतुजा अधिकारी यांच्यासह संजीत वायंगणकर, प्रयाग गांगुर्डे, दर्शन परब, कोमल पोवार, साहिल बोराडे, संचिता राऊळ, वैष्णवी कडव, श्रावणी सांगरे यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेऊन सहकार्य केले. या प्रसंगी साकडबावचे ग्रामसेवक, सरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते.
आदिवासी समाजातील मुलांच्या कला गुणांचा व अंगभूत कौशल्याचा विकास व्हावा तसेच रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध व्हावे, या दृष्टीने संस्थेतर्फेि विविध योजना राबिवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शालेय उपक्रम राबविण्याचा संस्थेचा विचार आहे. येथील आदिवासी पाड्यात रोजगार उपलब्ध नाही. प्यायला पाणीही उपलब्ध नसल्याने आदिवासींना कष्टदायक जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे येथे शिक्षण, कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयांना धरून जनजागृती करावी, तसेच विकासाच्या दृष्टीने आदिवासींच्या मुलांना योग्य मार्गदर्शन देऊन भविष्यात त्यांच्या जीवनाला कलाटणी देता यावी हाच या भेटीमागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.