ठाणे : माजिवडा-मानपाडा समिती क्षेत्रात प्रभाग उभी राहणाऱ्याअनधिकृत बांधकामांना सहाय्यक आयुक्त्यांचा आशीर्वाद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगत ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिले आहे. अशा प्रकारच्या आरोपांमुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा ठाणे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. संपूर्ण ठाणे शहरात आणि विशेष करून खाडीच्या पलिकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतानाही प्रशासनाचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सध्या माजिवडा मानपाड्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
माजिवडा मानपाड्यात सर्वाधिक बांधकामे होत असून या बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचा आशीर्वाद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून यामुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे. प्रभात समिती क्षेत्रात बिधास्त चाळी, सात ते आठ मजल्याच्या इमारती अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहत आहेत भू माफियांनी खाडी आणि महापालिकेची आरक्षित भूखंड देखिल सोडले नाहीत. या प्रभागातील अधिकारी कर्मचारी यांचे हात ओले करून अनधिकृत बांधकाम उभे राहत आहे त्याच प्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यानी देखिल रस्ते व्यापले आहेत.
या प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात यापूर्वी देखिल लोकप्रतिनिधींनी लेखी तक्रार केली होती. त्यामुळे आयुक्त श्री राव यांनी या प्रभाग समितीमध्ये बिनधास्त सुरु असलेल्या बांधकामची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी एखाद्या प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्यास त्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त आणि आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्रानंतर पालिका आयुक्त सौरभ राव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.