

corporator Shubhangi Bhanwal
उल्हासनगर : शिंदे शिवसेना सोडलेल्या नगरसेविका शुभांगी बहनवाल यांच्या पतीवर राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी चौधरी यांच्या कार्यकर्त्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात शिवसेना शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शुभांगी मनोज बेहनवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर स्थानिक शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास बेहनवाल यांचा कार्यकर्ता योगेश पवार हा विठ्ठलवाडीकडून येत असतांना हिराघाट चौक या ठिकाणी चौधरी यांचा कार्यकर्ता शिलरत्न जाधव व रतन उर्फ बाळा गायकवाड याने अडवुन तु राजेंद्र चौधरी साहेबांच्या विरोधात काम करतो का असे म्हणत पवार याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा अदखलपात्र गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
रात्री 11 वाजताच्या सुमारास योगेश हा बेहनवाल यांच्याकडे आला होता. त्यादरम्यान शिलरत्न जाधव याने पाठविलेले सचिन आहेर व इतर पाच इसम हे मोटर सायकलवर येवुन मोठ्याने आरडा ओरडा करुन परीसरात दशहत निर्माण केली. राजेंद्र चौधरी यांचे विरोधात काम करतात काय ? असे म्हणुन मनोज बेहनवाल व योगेश यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्याला विरोध केला असता तुम्ही राजेंद्र चौधरी साहेबांना ओव्हरटेक करता काय ? असे म्हणुन पुन्हा शिवीगाळ व मारहाण करु लागले. त्यातील एकाने खिशातुन मनोज बेहनवाल यांना मारण्यासाठी चॉपर काढला त्यावेळी परिसरातील नागरीकांनी मध्ये पडुन त्यांना पकडले. त्यांनी नागरीकांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करु लागले. त्यामुळे नागरिकांनीही त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शीलरत्न जाधव, रतन उर्फ बाळा गायकवाड, सचिन आहेर आणि इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, मंडळ अध्यक्ष हरेश भाटिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांची भेट घेत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.