

Sarita Khanchandani Death Case
उल्हासनगर: उल्हासनगर शिवसेना ठाकरे गटाचे नेते धनंजय बोडारे, उल्हास फाळके, शिवानी फाळके, जिया गोपलानी व राज चंदनानी यांच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
28 ऑगस्ट रोजी रोमा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून सरिता खानचंदानी यांनी जीवन संपविले होते. त्या हिराली फाउंडेशनच्या अध्यक्ष व एक नावाजलेल्या वकील होत्या. गुरुवारी सकाळी बाराच्या दरम्यान रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर त्या गेल्या. त्यांनी टेरेसवरील ग्रील वर बसून सर्वप्रथम आकाशाकडे बघून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून खाली उडी मारली.
हा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडताच या घटनेची खबर विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्वरित जखमी अवस्थेत पडलेल्या सरिता खानचंदानी यांना जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचे प्रकृती खूपच गंभीर असल्याने उल्हासनगरातील कॅम्प तीन परिसरातील मॅक्सि मॅक्स रुग्णालयात हालवण्यात आले.
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये संबंधित व्यक्तींची नावे नमूद केली आहेत. या आधारावर सरिता यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.