

डोंबिवली : दुबईचे 700 दिराम अल्पकिंमतीत देण्याचे आमिष दाखवून दोघा जणांनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
औषध विक्रेत्याला गंडा घालणार्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या तपासाला आता यश आले असून पोलिसांनी दोघाजणांना बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद सोहेल हसमुददीन शेख (30, रा. नेवाळी नाका, नेवाळी गाव ता. अंबरनाथ, मूळ गाव - कावलनगर, जि. खजूरी, नवी दिल्ली) आणि मोहम्मद अबुबकर रज्जाक चौधरी (41, रा. नेवाळी नाका, अंबरनाथ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, सपोनि प्रशांत आंधळे, जमादार भानुदास काटकर, हवा. राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनील पवार, आदींच्या पथकाने डोंबिवली जवळच्या खोणी पलावा परिसरात जाळे पसरले होते. या जाळ्यात मोहम्मद शेख आणि मोहम्मद चौधरी हे दोघेजण अडकले. मात्र त्यांचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील सुदामा नगरमध्ये भूपेंद्रनारायण बबन सिंग (51) या औषध व्यापार्याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे आरोपी नागरिकांना स्वस्त भावात दुबईतील चलन दिराम देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते. त्यासाठी आपली नावे बदलून नागरिकांची फसवणूक करत होते.
भूपेंद्रनारायण सिंग यांचा मित्र रमेश जैस्वाल यांनी गेल्या आठवड्यात सिंग यांना आपला एक मित्र रामअभिलाख पटेल यांच्या ओळखीच्या तिघांकडे दुबईच्या आर्थिक व्यवहारातील 700 दिराम चलन असून ते स्वस्तात देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्रिकुटाने दुबईच्या 700 दिरामच्या मोबदल्यात तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली. भूपेंद्रनारायण यांना विश्वास वाटल्याने त्यांनी दिराम असलेले बंदिस्त बंडल घेऊन या तिघांना 4 लाख रुपये तत्काळ दिले. त्यानंतर त्यांनी बंडल उघडून पाहताच त्यात कागदाची रद्दी असल्याचे पाहून भूपेंद्रनारायण यांना धक्काच बसला.