ठाणे : दुचाकी, कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
भिवंडी : दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रक्कमेतून पिकनिकसाठी गोविदांचं पथक गेले होते. त्यानंतर पिकनिक करून परतणार्या तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्या कंटेनर चालकाने जोरदार धडक दिली. धडकेत भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील शांग्रीला रिसॉर्ट नजीक असलेल्या वडपे गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा पोलिसांनी शोध सुरू आहे.
आशिष लालजीत वर्मा (15, रा. टावरे कंपाऊंड, अशोकनगर) आणि खुर्शीद आलम उर्फ अयान नाजीर अली अन्सारी (18, रा. गुप्ता कंपाऊंड, कारीवली) असे भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर राहुल हिरालाल प्रजापती (21) असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा करून विविध राजकीय पक्षाच्या वतीने लाखोंची रक्कम दहीहंडी फोडणार्या पथकांना बक्षीस म्हणून जाहीर करून दिलीही होती. त्यातच मृतक आशिष आणि खुर्शीद आलम हे दोघेही भिवंडी शहरातील एका गोविंदा पथकात दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकात सामील होते.
पथकातील गोविंदानी दहीहंडी फोडल्यानंतर बक्षीस रूपात मिळालेल्या रक्कमेतून पिकनिक करण्याचे ठरवले होते. त्यानुसार 1 सप्टेंबर रविवार असल्याने त्यांनी बेत आखला होता. पिकनिकसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंद गावाच्या हद्दीत असलेल्या शंकर तावडे यांच्या फार्म हाऊसवर रविवारी सायंकाळच्या सुमाराला गोविंदा पथकातील 20 ते 25 जण आप आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाने गेले होते. त्यानंतर पिकनिक करून घरी परत येताना तीन मित्र दुचाकीने सोमवारी 2 सप्टेंबर रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गाने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ते वडपे हद्दीत आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला. तर पाठीमागील दोघेही रस्त्याच्या मधोमध पडल्याने त्यांना कंटेनर चालकाने चिरडून पसार झाला.
सीसीटीव्हीच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू
सुदैवाने या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. मात्र दोघांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीवरील तिघांनाही उपचारासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर राहुल हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी राहुलच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलिस पथक घटनास्थळ आणि मुंबई - नाशिक महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार चालकाचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिली आहे. या घटनेमुळे भिवंडीतील गोविंदा पथकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.