डोंबिवली : ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरासह या तिन्ही शहरांतील पादचारी, तसेच प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याऱ्या कर्नाटक आणि तेलंगणातील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात लोहमार्ग क्राईम ब्रँचच्या कल्याण पथकाला यश आले आहे. या दोन्ही चोरट्यांना गुरूवारी (दि.६) कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख ७९ हजाराचे महागडे ४२ मोबाईल जप्त करण्यात आले.
चिन्ना व्यंकटेश पुसला (वय ३२, रा. हुबळी, धारवाड, कर्नाटक) आणि अशोक हनुमंत आवुला (वय २५, रा. तेलंगणा, सध्या रा. दहिसर मोरी, शिळफाटा, ता. कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून १९ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हे मोबाईल ते चोरटे परराज्यात जाऊन विकणार होते, अशी माहिती लोहमार्ग क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली. अटक केलेल्या चोरट्यांनी आतापर्यंत २३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
कल्याण-डोंबिवलीसह ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात स्थानिक लोहमार्ग पोलिस ठाण्यांत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले आणि त्यांच्या पथकाने मोबाईल चोरीचा छडा लावला.
तपास सुरू असताना क्राईम ब्रँचला दोन मोबाईल चोरटे कल्याण रेल्वे यार्डातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी जात असल्याची माहिती खासगी गुप्तहेरांनाकडून मिळाली होती. क्राईम ब्रँचने तातडीने रेल्वे यार्डाकडे धाव घेतली. त्यावेळी दोन इसम गप्पा मारत यार्डाकडून स्थानकाच्या दिशेने येताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांशी झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. या चोरट्यांनी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरासह शहरी भागातही मोबाईल चोरल्याची कबुली दिली.