

Tuljabhavani replica temple Thane
ठाणे : महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता म्हणजे आदिशक्ती आई तुळजाभवानी! देशातील 51 शक्तिपीठांपैकी अन् महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. याच शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारले आहे.
आई भगवतीचे ठाण्याच्या गणेशवाडी- पांचपाखाडी येथे असलेले मंदिर आपणा सर्वांना माहित आहे. शारदीय नवरात्रोत्सवात या मंदिरात मुंबई- ठाण्यातील अनेक भाविक येथे येत असतात. हे मंदिर येथील नागरिकांनी उभाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कालांतराने या मंदिराच े काम रखडले. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी साधारणपणे 25 ते 30 वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या मूर्तीची गळाभेट घडवून आणलेल्या मूर्तीची 2 व 3 मार्च 2004 रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
मात्र, या देवीचे विद्यमान स्थितीमधील हे मंदिर जीर्ण होत चालले होते. शिवाय, भविष्यातील वाढणारी वाहतूक पाहून डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर थेट तुळजापूरची अनुभूती देणारी ही वास्तू आई तुळजाभवानीनेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून आपले निवास घडवून आणले आहे, असे म्हटल्यास अनुचित ठरणार नाही.
आई तुळजाभवानीच्या नवीन मंदिरासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे महानगर पालिकेकडून मिळविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन हे आराखडा मंजूर करुन घेण्यात आला. शासकीय परवानग्या आणि इतर बाबींची पूर्तता करुन उभारलेले हे मंदिर आहे.
सुरुवातीला जागेच्या माती परिक्षणापासून सुरुवात झाली अन् प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपुजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मंत्रोच्चार, देवतांचे अवाहन, होम-हवन आदी सर्व विधींची पूर्तता करुन हा भूमिपुजन सोहळा पार पडला; अन् प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात झाली.
काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे; या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा, अशी मनस्वी इच्छा डॉ. जितेंद्र आव्हाड यांची होती. अन् या इच्छेतून थेट तमीळनाडूचे सेलम अन् आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठण्यात आले. तेथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिव शंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड क्रियेटीव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली.शिखर कळश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. अन् प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला.
सुमारे 1 हजार 350 टन काळ्या पाषाणाचा वापर करुन 33 फुटांचा कलश अन् त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, 26 स्तंभ, 20 गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड, 108 दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे.पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे.
ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर निर्माण झाले आहे. हे मंदिर म्हणजे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन शिल्पकलेचा आविष्कार आहे. सर्वसामान्यांना खुले असणारे हे मंदिर ५०० वर्ष साक्ष देईल,असे वास्तुविशारकांचे म्हणणे आहे. ३० एप्रिलरोजी सकाळी होणाऱ्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात समस्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे.