

कसारा (ठाणे ): शाम धुमाळ
उंबरमाळी रेल्वे स्थानकावर क्षयरोगाने ग्रस्त एक बेवारस रुग्ण आडोशाला बॅग घेऊन वेदनेने विव्हळत पडलेला होता. तो बोलू शकत नव्हता, मात्र वेदनेने ओरडत मदतीची याचना करत होता. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने त्याला मदत करण्याऐवजी स्थानकाच्या बाहेर हाकलून लावले व त्याची बॅगही फेकून दिली.
पावसापासून बचावासाठी थांबलेल्या या रुग्णाला कोणत्याही प्रवाशाने, दुकानदारांनी अथवा स्थानिक अधिकाऱ्यांनी मदत न केल्याचे धक्कादायक चित्र होते. अखेर सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य भारत धोंगडे व सुनील वाघचौरे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व रुग्णाला तातडीने मदतीचा हात दिला. पोलीस व आरोग्य विभागाशी संपर्क साधत तात्काळ मदतकार्य सुरू केले.
कसारा पोलीस ठाण्याचे उमेश चौधरी यांच्या मदतीने रुग्णाला खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे क्षयरोग व निमोनियाचे निदान झाले व प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे सुनील करवर यांनी खासगी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णाला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र तिथे दाखल करण्यास नकार मिळाल्यावर रुग्णाला कळवा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रुग्णाची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले. ऑक्सिजन पातळी कमी, ताप अधिक, आणि क्षयरोगामुळे स्थिती चिंताजनक होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवडी रुग्णालयाने मात्र गंभीर रुग्णाला दाखल न करता रुग्णवाहिका चालक व पोलिसांना दमदाटी करत हुसकावून लावले. दुसरीकडे, 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने गंभीर रुग्णाच्या मदतीसाठी विलंब झाला. एमईएमएस ठेकेदार कंपनीचे निलेश घोडविंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
स्थानकाबाहेर वनविभाग व अनेक दुकानदार असूनही कोणीही मदतीस धावून आले नाही. पावसात वेदनेने तडफडणाऱ्या बेवारस रुग्णाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. याउलट आपत्ती व्यवस्थापन टीम व पोलिसांनी दाखवलेली तत्परता व मानवतेचा परिचय कौतुकास्पद ठरत आहे.