भिवंडी : भिवंडी - कल्याण रोडवरील साईबाबा मंदिराजवळ कोळश्याने भरलेल्या एका 16 टायर ट्रकचा एक्सल अचानकपणे तुटला. त्यामुळे कल्याण रोडवर तब्बल 3 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान कोनगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी हायड्राच्या मदतीने वाहतूक कोंडी सुरळीत केली.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांसह प्रवाश्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. कोनगाव वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर यांनी सांगितले की, मंगळवारी (दि.22) सकाळी 6 वाजेच्या सुमारास कल्याण रोडवरून 30 टन कोळश्याने भरलेला ट्रक भिवंडी बायपासच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रक साडेसहा वाजता साई बाबा मंदिराच्या अलीकडे पोहचला असता अचानकपणे ट्रकचा एक्सल तुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध येवून थांबला. त्यानंतर वर्दळीच्या वाहनांमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी वाढत गेल्याने पादचार्यांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गही या वाहतूक कोंडीत अडकला होता. त्यानंतर कोनगाव वाहतूक शाखेने प्रचंड प्रमाणात झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तात्काळ 4 हायड्रा घटनास्थळी पाचारण करून त्या ट्रकच्या चहू बाजूंनी लावून 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवला. त्यानंतर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना इच्छित स्थळी पोहचण्याचा मार्ग खुला झाला.