Thane | आदिवासी विद्यार्थ्यांनी शाळेत बजावला मतदानाचा हक्क

लोकशाही मार्गाने निवडणार मंत्रिमंडळ; जि. प. शाळेतील अनोखा उपक्रम
किनिस्ते जिल्हा परिषद शाळा, खोडाळा, ठाणे
किनिस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शाळेतील मंत्रिमंडळ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेण्यात आली. pudhari news network
Published on
Updated on

खोडाळा : भारतीय लोकशाही व निवडणूक प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने शनिवारी (दि.६) किनिस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने शाळेतील मंत्रिमंडळ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेण्यात आली. मोखाडा तालुक्यातील केंद्रशाळा किनिस्ते येथे एक अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करताना प्रत्येक विद्यार्थ्यांने निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करण्याचा अनुभव घेतला.

Summary

मोखाडा तालुक्यातील केंद्रशाळा किनिस्ते येथील जिल्हा परिषद शाळेत उमेदवार अर्ज, अनामत रक्कम, प्रचार, मतपत्रिका, मतमोजणी आणि मंत्रिमंडळ स्थापन करणे या प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना प्रात्यक्षिकरित्या उतरविण्यात आल्या. त्यानंतर लोकशाही पद्धतीने शाळेतील मंत्रिमंडळ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेण्यात आली.

आजचे विद्यार्थी हे भावी मतदार असल्याने त्यांना भावी काळात लोकशाही व त्या लोकशाहीचा मुख्य घटक असलेले मतदान ही प्रक्रिया कशी पार पडते हे समजण्यासाठी मुख्याध्यापक विनोद करपे यांच्या पुढाकाराने अशा पद्धतीची निवडणूक घेण्यात आली. लोकशाहीप्रती सजग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व कल्पना सत्यात उतरवून एक आगळा वेगळा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद टिपण्यात आला.

किनिस्ते जिल्हा परिषद शाळेत 1 ली ते 8 वीचे एकूण 238 विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्व विद्यार्थी आदिवासी, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. सन 2018 पासून याठिकाणी कार्यरत नवीन शिक्षक चमू आणि शाळा व्यवस्थापन समिती अनोखे नवनवीन उपक्रम राबवून मुलांना शाळेत टिकवण्यासाठी आणि सुसंस्कारित करण्यासाठी आदर्शवत व नवीन नवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहे. चालू शैक्षणिक वर्षात शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिलीप बांगर, जगन्नाथ चौरे, उमेश चव्हाण, दशरथ फसाळे, शशिकांत राठोड आणि मुख्याध्यापक विनोद करपे यांनी शाळा प्रवेशोत्सव नंतर लोकशाही मतदान पद्धती ही प्रक्रिया मुलांना प्रात्यक्षिकरित्या समजावत हुबेहूब मतदान प्रक्रियाच शाळेत राबविली. गेल्या 3 दिवसापासून उमेदवार अर्ज, अनामत रक्कम, प्रचार, मतपत्रिका, मतमोजणी आणि मंत्रिमंडळ स्थापन करणे या प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना प्रात्यक्षिकरित्या उतरविण्यात आल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया लोकशाही पध्दतीने कशा प्रकारे अवलंबिली जाते याचे ज्ञान अवगत झाले. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची असते, या अनुषंगानेच हा उपक्रम राबवला.

आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेची गोडी अधिक प्रमाणात निर्माण व्हावी व त्यांचे मन शाळेत रमावे यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांची प्रगती साधत आहे. शिक्षणाबरोबरच लोकशाही पध्दतीने निवडणूक प्रक्रियेची कल्पना सत्यात उतरवून विद्यार्थ्यांना मतदारांचे निवडणुकीतील महत्व पटवून दिले.

विनोद करपे, मुख्याध्यापक, केंद्र शाळा, किनीस्ते, खोडाळा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news