ठाणे : वाघोबा खिंडीत ट्रेलर पलटी; चालक जखमी
बोईसर (ठाणे) : वाघोबा खिंडीत पुन्हा एकदा अपघाताची पुनरावृत्ती झाली असून, बुधवारी (दि.23) रोजी पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास ट्रेलर पलटी होअऊ न ही अपघाताची घटना घडली आहे.
सिमेंट मिश्रित रेडीमिक्स काँक्रीटची खडी रस्त्यावर सांडल्याने ट्रेलर घसरून पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोईसर-चिल्हार मार्गावरील वाघोबा खिंड हे एक अपघातप्रवण ठिकाण ठरत आहे. एमआयडीसीकडे जाणार्या रेडीमिक्स काँक्रीटच्या बंकनरमधून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेला जात आहे. त्यामुळे सतत रस्त्यावर सिमेंट मिश्रित खडी सांडत असून, यामुळे रस्ता अत्यंत घसरडा होत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून, नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान सदरच्या अपघातानंतर येथे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत ट्रेलर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

