ठाणे : खड्डेमय रस्ते, अर्धवट आणि निकृष्ट रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे ठाणे, भिवंडीत दररोज वाहतूक कोंडीचा विस्फोट होत असल्याने नागरिकांसह मंत्री देखील त्रस्त झाले आहेत. त्याचे तीव्र पडसाद आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. अखेर रखडलेल्या माजिवडा ते वडपे या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे निकृष्टदर्जाचे काम झाल्याप्रकरणी एमएसआरडीसीचे उपअभियंता डोंगरे यांना तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीचे विकेंद्रीकरण करून वाहतूक कोंडीमुक्त ठाणे करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत अभ्यास करून मास्टर प्लॅन बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर आमदार किसन कथोरे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आमदार, पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रस्त्याच्या कामांसह वाहतूक कोंडी, पाणी टंचाईचा प्रश्न गाजला.
घोडबंदर रोड आणि भिवंडी नाशिक रोडला रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांना रुग्णवाहिकेत प्राण गमवावे लागत आहेत. विद्यार्थी तसेच नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरकार आणि लोकप्रतिनिधींबाबत असंतोष निर्माण झालेला आहे. हा असंतोष राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मांडला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. समृद्धी महामार्गासोबत माजिवडा - वडपे रस्त्याचे काम एमएसआरडीसीने सुरु केले. मात्र अद्याप ते पूर्ण होऊ न शकल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट झाले असून ते कधीही पडू शकते, अशी तक्रार खासदार म्हात्रे यांनी केल्यानंतर भाजपचे आमदार किसन कथोरे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यास दुजोरा देत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. या रस्त्याचे काम माजी मंत्री कपिल पाटील यांचा मुलाकडे असून राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. तसेच ठेकेदारावरील कारवाईची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. तर संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगून उड्डाणपुलाचे निकृष्ट काम झाल्याची कबुली दिली. त्यानंतर एमएसआरडीसीचे उपअभियंता डोंगरे यांना तातडीने निलंबित करून रस्त्याचे काम पुढील बैठकीपर्यंत पूर्ण न झाल्यास अधीक्षक अभियंत्यावर कारवाईचा इशारा दिला. मात्र ठेकेदाराबाबत त्यांनी भाष्य करणे टाळल्याने खासदार - आमदारांची निराशा झाली.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतुकींमुळे लोकप्रतिनिधींवर आरोप होत असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका आम्हाला बसत असल्याची नाराजी व्यक्त केली. तेव्हा वाहतूक विभागाकडून या रस्त्यावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत असलेल्या कारणांची यादी देण्यात आली. त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामे, कच्चे रस्ते, गोदामे, बॉटल नेट आणि समृद्धी महामार्गाववरून ठाण्यात येणाऱ्या मराठवाडा, विदर्भातील नवीन वाहतूक जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. यावर अल्पावधी, मध्य आणि कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करण्यासाठी पाच कोटींची तरतूदही आजच्या बैठकीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी एमएमआरडीएच्या टीएमसी विभागाला देण्यात आली आहे.
मलंगडावरील फ्युनुकूल ट्रॉली सुरु होणार
सुप्रसिद्ध मलंगगडावरील फ्युनिकल ट्रॉलीचे काम पूर्ण झाले असून त्याचे उदघाटन करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली. तेव्हा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून ती सुरु करण्याची परवानगी शासनाकडे मागण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर ट्रॉलीचे लवकरच उदघाटन करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या गैरहजेरीची चर्चा
वाहतूक कोंडी , पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते, अर्धवट असलेले रस्ते आणि अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान असे महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक महत्वाची होती. या बैठकीला अपेक्षेप्रमाणे वनमंत्री गणेश नाईक हे गैरहजर राहिले. त्यातून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आणि माझ्या रेंजचा एकही राजकारणी ठाणे जिल्ह्यात नसल्याच्या विधानाची चर्चा रंगली होती.