

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जातीने लक्ष देऊन घोडबंदर रोडवरील वाहुतककोंडी काही सुटेना. दहा मिनिटांच्या अंतरासाठी दोन ते अडीच तास लागत आहे. वारंवार कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याची दुरुस्ती करून ही रस्ता खड्ड्यात हरवत असल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीने ठाणेकर हैराण झाले आहेत. त्यात आज जोरदार पाऊस पडल्याने पाणी रस्त्यावर आला आणि वाहने कासवाच्या गतीने धावली. परिणामी चार-चार तास वाहनांमध्ये बसून राहावे लागण्याने प्रवाशांनी ठाणे महापालिका आणि सरकारच्या नावाने लाखोल्या वाहिल्या.
घोडबंदर रोड हा राष्ट्रीय महामार्ग असून तो गुजरातला जातो. या रस्त्यावरून मुंबई, मीरा भाईंदर, पालघरसह सुरतकडे वाहने जात असतात. जेएनपीटीकडून येणार्या अवजड वाहने देखील याच मार्गाला ये-जा करतात. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. त्यात सर्व्हिस रोड खोदून ते महामार्गात सामील करण्याचा आत्मघातकी काम एमएमआरडीएकडून केले जात आहे. सुमरे 800 कोटी खर्चून हा हा सेवा रस्ता बंद करून घोडबंदरवासियांच्या जीवाशी खेळण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. त्याचा फटका वाहतुकीवर होऊ लागला असून रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
घोडबंदर रोडची दुरुस्ती कोणी करायची यावरून राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांच्यात वाद होऊ लागला आणि त्याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिक अभय ओक यांनी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यात हरविलेल्या रस्त्याबाबत तीव्र नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली. त्याची दाखलक घेत नामदार शिंदे यांनी गायमुख घाटाची पाहणी करून रस्ते दुरुस्तीची पहाणी करीत संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले. मात्र उपयोग काही झाला नाही.
नव्याने जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणारे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीची पाहणी करून जातीने लक्ष दिले. असे असतानाही ओवळा ते फाऊंटन पर्यंतच्या रस्त्याची काही दुरुस्ती होऊ शकली नाही. गायमुख घाटात दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्ती केली जाते. मात्र निकृष्ट कामामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडतात. गेल्या सहा महिन्यात दोनदा दुरुस्ती होऊनही रस्ता खड्ड्यात हरविलेला आहे.
दुर्दैवाने आज मुसळधार पाऊस पडू लागल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्या वाहनचालक आणि प्रवाशांना चार चार गाडीतच बसण्याची वेळ आली. खड्ड्यात हरविलेल्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने काढण्यास अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे संतप्त झालेले प्रवाशी हे सरकारच्या नावाने खडे फोडताना दिसत होते. तर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ओवळा नाका ते फाउंटन हॉटेल 2.30 तास लागले. ठाण्याचा विकास जोरात चालू आहे, अशी टीका करीत विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे.