ठाणे : ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यांमुळे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकार्यांना धारेवर धरले. त्यानंतर तातडीने ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी गायमुख घाटात जाऊन पोलीस यंत्रणा आणि पालिका यंत्रणेसोबत पाहणी करीत कृती आरखडा तयार केला आहे. 8 ऑगस्टपासून त्या आराखड्यानुसार रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार आहे.
ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील वाहतूक कोंडीसंदर्भात सर्व वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी तातडीने ठाणे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामध्ये होणार्या वाहतूक समस्येबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी ऊर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, तहसीलदार उमेश पाटील, सा. बां. विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता प्रसाद सनगर व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकजुटीने समस्येचे निराकरण करावे...
रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 8 ऑगस्टपासून रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्यात येणार आहे. संभाव्य पाऊस, वाहनांची वाहतूक या सर्व बाबींच्या अनुषंगाने विचारपूर्वक आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पांचाळ यांनी बैठकीत दिले. तसेच ही सर्व कामे रस्ते सुरक्षा समितीच्या समन्वयाने तसेच अपघात होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा अवलंब करून मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.