

मुरबाड (ठाणे) : मुरबाड माळशेज रस्त्यावर उल्हासनगर येथील बावीस वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे, तर त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला आहे.
उल्हासनगर येथील मयुर नारायणदास सुहानंद (22) व राजगोपाल अहुजा हे दोघे उमरोली येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस चौकी समोर जात असता दुसर्या बाईकस्वाराला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात पाठीमागे बसलेला मयुर सुहानंद हा जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मुरबाड मामनोली दरम्यान एका तरुण मोटार सायकल चालकाची बाईक घसरून तो खाली पडला असता पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्याला चिरडण्याचा घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती उमरोली येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस चौकी समोर होऊन उल्हासनगर येथील बावीस वर्षीय तरुणास भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्यटकांवर बंदी आदेश जारी केला तरी माळशेज घाटात शनिवार व रविवार या दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश फाट्यावर मारून शेकडो पर्यटक मौजमजेसाठी येतात. त्यातूनच अशा घटना घडत असल्याचे दिसून येतात.