Thane | पारंपरिक बुरुड कला लोप पावण्याच्या मार्गावर

प्लास्टिक वस्तूंना पसंती; कारागिरांवर उपासमारीची कुर्‍हाड
हस्तकला कारागिर
हस्तकला कारागिरांवर उपासमारीची कुर्‍हाडPudhari News Network
Published on
Updated on

तलासरी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यांमध्ये बांबू हस्तकलेपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे तयार होणार्‍या वस्तूंच्या स्पर्धेत पारंपरिक हस्तकला काहीशी लोप पावत चालली असल्याचे चित्र आहे.

Summary

ग्रामीण भागातील कुटुंबे आधुनिकतेच्या सोबतच पारंपरिक कलेचा वारसा टिकवून बांबू, साग, शिसव या झाडापासून टोपली, सूप, इरले, कनगे, जात्याच्या कडा, बैलगाडीचे आरे, तसेच अनेक शोभिवंत वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात सर्रासपणे करत आहेत. परंतु प्लास्टिकच्या स्वस्तात बनवलेल्या वस्तूंनी बाजारपेठेत शिरकाव केलेला असल्याने लाकडापासून व बांबू पासून वस्तू बनवणार्‍या कारागिरांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बुरुड कारागिरांनी आपले व्यवसाय हळूहळू बंद करायला घेतले आहेत.

जव्हार, मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू,साग लागवड करण्यात आलेली असून या बांबूचा व सागाचा वापर शोभिवंत आणि गरजेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जात आहे. जरी आधुनिकतेच्या काळात नव नवीन प्लास्टिकच्या वस्तू बाजारात उपलब्ध झालेल्या असल्या तरी देखील लाकडी वस्तूंनी सुद्धा आपली सुबकता बाजारात टिकवून ठेवली आहे. सण उत्सवाच्या काळात प्लास्टिक वस्तूंच्या बरोबरच लाकडापासून बनवलेल्या वस्तूंना सुद्धा अधिक मागणी आहे. ग्रामीण भागात लाकडापासून कोरीव शिल्प करणारे कारागीर आणि बुरुड कलाकार यांनी तयार केलेली टोपल्या, टारले, सूप, इरले, कनगे आदींसह लाकडापासून सोफा, बॉक्स पलंग, जनावरांचे लाकडी मुखवटे आदी सुबक वस्तू आजही बाजारात उपलब्ध होत आहेत. परंतु, वस्तू बनविण्यासाठी लागणार्‍या लाकडांचा तुटवडा, वेळखाऊ प्रक्रिया तसेच मेहनत जास्त कामाचा मोबदला कमी, त्यामुळे ग्रामीण भागातील बुरुड कलाकार, कोरीव शिल्प कारागीर यांनी आपले व्यवसाय हळूहळू बंद करून इतर व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. दिवसेंदिवस मानवापासून पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने साग, बांबू, शिसव यांची वने लुप्त होत चालली आहेत. त्यामुळे वनविभाग सुद्धा साग, शिसव,बांबू तोडायला परवानगी देत नाही, म्हणून ग्रामीण भागातील कारागिरांच्या उद्योगांना उतरती कळा लागली आहे.

पूर्वी खेडोपाडी हस्तकलेच्या वस्तू बनविणारी एक पिढी कायम काम करत होती. या वस्तूंना खेड्यातच नव्हे शहरात देखील मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु काळानुरूप प्लास्टिक कंपन्यांनी या कारागिरांची जागा घेतल्याने ग्रामीण भागातील हस्तकलेच्या वस्तू निर्मिती करणारे कारागीर बेकार झाले. शेवटी आपले पूर्वीचा व्यवसाय बंद करून नवीन कामधंदा सुरू करायला लागले आहेत.

टोपली, सूप, कनगे इत्यादी साहित्य आम्ही बांबूपासून बनवत होतो. आम्हाला रोजगार सुद्धा चांगला मिळत असे. परंतु आता हेच साहित्य प्लास्टिकपासून बनत असल्याने आमचा पारंपरिक बुरुड व्यवसाय बंद झाला आहे.

सोमा माळी, बुरुड, कारागीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news