

ठाणे : ठाणे खाडी किनारी 50 एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर 260 मीटर उंचीचा आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवर 300 मीटर उंच आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे 25 एकरमध्ये टाऊन पार्क बीओटी तत्वावर उभारण्याची आज मुंबईत घोषणा केली.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अधिकाऱ्यांनी केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. ठाण्यात कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, 12.5 एकरमध्ये पक्षी संग्रहालय, 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर व 50 एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाईल. त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून 18.4 कि.मी लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत, तसेच ठाणेकरांचे जीवनमान उंचावणार असून ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरु झाली असून हे सर्व प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केले जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रैक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे या ठिकाणी कोणतंही कॉक्रिटचं होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.