ठाणे : कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत

मनसे विरुद्ध उद्धव सेना आमनेसामने; शिंदे सेनाही रणांगणात ?
विधानसभा निवडणूक 2024
विधानसभा निवडणूक 2024Pudhari News network
Published on
Updated on
डोंबिवली : बजरंग वाळुंज

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना या मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार हे निश्चित असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघासाठी नेमका कोणता पवित्रा घेतात, याची सर्वाधिक उत्सुकता आहे.

Summary

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत माघार घेणारे माजी आमदार सुभाष भोईर हे यावेळी मात्र शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या दोघा-तिघा इच्छुकांनी देखिल या मतदार संघावर दावा केल्याने चुरशीच्या ठरणाऱ्या या तिरंगी लढतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना 3 लाख 80 हजार मतदान झाल्याने सद्या उद्धव ठाकरे गटाचा हुरूप वाढलेला दिसतो. मात्र कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 लाख 51 हजार 702 मते मिळाली. तर वैशाली दरेकर यांना 65 हजार 407 मते मिळाली. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा आकडा पाहता महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान फारसे वाटत नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेचे राज ठाकरे यांची भूमिका देखील यावेळी महत्त्वाची ठरणार आहे. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

2019 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव करत मनसेचे राजू पाटील हे निवडून आले. त्यावेळी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेचे नेते राजू पाटील यांनी रमेश म्हात्रे यांना पराभूत केले. मध्यंतरीच्या काळात मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचे देखील पहायला मिळाले. तथापी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराना पाठिंबा दिल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरम्यान कल्याण ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटातून राजेश मोरे आणि रमाकांत मढवी ही नावे चर्चेत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना केलेली मदत पाहता या मतदारसंघात शिवसेना मनसेला मदत करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेतात, तसेच शिवसेनेचा शिंदे गट राजू पाटील यांनी केलेल्या मदतीची परतफेड करणार का ? हे देखिल पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मदतीच्या परतफेडीची मनसेला अपेक्षा

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच डॉ. शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 51 हजार 702 मते मिळाली. त्यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे.

कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघावर आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असले तरी यावेळी मातब्बरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी याच मतदारसंघाने दोनदा मनसेच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने कौल कुणाच्या बाजूने देतात याकडे जिल्ह्यातील साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

...तर शिवसेनेत मतांची विभागणी

शिवसेनेकडून डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस वाढली आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मतांमध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवले होते. मात्र शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर भोईर उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.

विभागणीचा फटका दोन्ही सेनांना बसण्याची शक्यता

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे प्रमोद उर्फ राजू रतन पाटील 93 हजार 927 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे रमेश सुकर्‍या म्हात्रे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. म्हात्रे यांचा 7 हजार 154 मतांनी पराभव झाला. तत्पूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष गणू भोईर 84 हजार 110 मते मिळवून विजयी झाले. मनसेचे रमेश रतन पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. यात भोईर यांच्या विजयाचे अंतर 44 हजार 212 मतांचे होते. या निवडणुकीत शिंदे सेनेकडून त्यांचा उमेदवार उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत सुभाष भोईर हे 44 हजार 212 मतांच्या अंतराने निवडून आले असले तरीही यावेळी त्यांना शिवसेनेच्या विभागणीचा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तथापी दोन्ही शिवसेनेच्या मत विभागणीचा लाभ मनसेला होऊ शकतो, अशीही शक्यता नाकारता येत नाही.

असा आहे मतदारसंघ

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - 144 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 6 आणि 7 आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 6 आणि 7, कल्याण तालुक्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 31 ते 34, 51 ते 56, 66, 67 आणि 69 ते 77, कल्याण महसूल मंडळ (भाग) निळजे आणि हेदुटणे सझा यांचा समावेश होतो. कल्याण ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.

मतदार आणि मतदान केंद्रांची व्यवस्था

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 502445 मतदार आहेत. यातील पुरूष मतदार - 271754, महिला मतदार - 230563, इतर -128, सैनिक मतदार - 68, एनआयआर मतदार - 49, 18 वयोगटातील मतदार - 10772, दिव्यांग मतदार - 2379 आणि 85 वयापुढील - 2877 मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण 4 33 मतदान केंद्र आहेत. एकूण पदनिर्देशित ठिकाणची केंद्रे 121, पक्क्या इमारतीतील केंद्रे 334, पार्टिशनमधील केंद्रे 86, मंडपातील केंद्रे 13 आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील केंद्रे 45 आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news