

नेवाळी : अतिक्रमणांमुळे १४ गावांना नवी मुंबईत विरोध सुरू असताना या गावांमधील बिकट परिस्थिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. भंगार माफियांनी आपले संसार थेट नैसर्गिक नाल्यांवरच थाटल्याचे दिसून येत आहेत. महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग यंदा पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
या गावांच्या वेशीवरून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या महाभयंकर अतिक्रमणामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद होत असल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त होते. यंदा पावसाळ्यात महामार्ग जलकोंडीच्या जाचातून मुक्ततेसाठी नवी मुंबई मनपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ठाणे तालुक्यातील १४ गावांमधून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे रूपांतर नदीपात्रात होत असतो. या पाण्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. सद्यस्थितीत उत्तरशिव, गोठेघर, दहिसर परिसरात भंगार माफियांनी सर्व नैसर्गिक नाले बंद केले आहेत. या नाल्यांवर कंटेनर टाकले आहेत.
तर काही ठिकाणी नाले बुजविण्याचे कामसुद्धा करण्यात आले आहे. भंगार माफियांनी घातलेला हैदोस पाहून राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी देखील हा मुद्दा उपस्थित करत १४ गाव नवी मुंबईत घेण्यास विरोध दर्शविला होता. मात्र सद्यस्थितीत या गावांमधील सुरू असलेल्या भंगार माफियांच्या हालचालींवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे या भंगार माफियांचे अतिक्रमण वेळेत हटवले नाही, तर महामार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती यंदा देखील जैसे थे आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेले नैसर्गिक नाले हे सध्या भंगार माफियांच्या अतिक्रमणाने बंद झाले आहेत. वाढते अतिक्रमण या परिसरासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे. मात्र या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष सुरू असल्याने प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.