डोंबिवली : रस्त्याच्या मधून चालणार्या पादचार्यांना दूर करण्यासाठी एका रिक्षावाल्याने भोंगा वाजवला. मध्यरात्रीचा सुमार असल्यामुळे भोंग्याचा कर्णकर्कश आवाज सहन न झाल्याने एक पादचारी भडकला. भोंगा वाजवल्याचा जाब विचारत माथेफिरू पादचार्याने रस्त्यावर पडलेला अवजड दगड उचलून रिक्षावाल्याच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात रिक्षावाला बचावला असला तरी जबर जखमी झाला आहे. शनिवारी (दि.17) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना ठाकुर्ली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात घडली.
लक्ष्मण चौधरी असे हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षावाल्याचे नाव असून तो ठाकुर्ली पूर्वेतील विसर्जन तलाव परिसरात असलेल्या एका सोसायटीत कुटुंबीयांसह राहतो. शनिवारी (दि.17) रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मण हा त्याच्या रिक्षातून प्रवासी वाहतूक करत होता. काही पादचारी रस्त्याच्या अगदी मधून चालले होते. त्यांना बाजूला करण्याच्या उद्देशाने लक्ष्मण याने रिक्षाचा भोंगा वाजविला. कर्णकर्कश आवाजामुळे एक पादचारी भडकला. त्याने लक्ष्मण याला भोंगा का वाजविला? असा जाब विचारला. रस्त्याच्या मध्य भागातून चालत असल्याने रिक्षाचा धक्का लागला असता म्हणून भोंगा वाजवून बाजूला होण्याचा इशारा दिला, असे लक्ष्मण चौधरी याने पादचार्याला उत्तर दिले. मात्र पादचारी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने लक्ष्मणशी वाद वाढवला. पादचारी प्रचंड संतापला होता.
रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड उचलून माथेफिरूने रागाच्या भरात लक्ष्मणच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात लक्ष्मण रक्तबंबाळ झाला. इतर रिक्षावाल्यांसह काही पादचारी मधे चालक, प्रवासी पडले. डोक्यात दगडाचा वर्मी घाव बसल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून पादचार्याला दूर केले. अन्यथा माथेफिरू पादचार्याच्या पुनर्रहल्यात चौधरीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असे काही पादचार्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती कळताच रिक्षाचालक लक्ष्मण चौधरी याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी लक्ष्मण याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लक्ष्मणचा मुलगा अनिकेत (23) याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी हल्लेखोर माथेफिरूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर काते हल्लेखोराचा शोध घेत आहे.