ठाणे : आरटीओच्या कारभाराविरोधात रिक्षा संघटना करणार आंदोलन

८ जुलै रोजी इंदिरा चौकात उपोषण; रिक्षा संघटनाचे आंदोलन
rickshaw Sanghtna
ठाणे: रिक्षा चालकांच्या समस्यांसाठी रिक्षा संघटना उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.file photo

डोंबिवली : कल्याण आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत दुरध्वनीसह प्रत्यक्ष भेटून बऱ्याच वेळा चर्चा केली. रिक्षा चालकांच्या अडीअडचणी, समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. तरीही रिक्षा चालकांच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. नियमाप्रमाणे शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते. वारंवार लक्ष वेधूनही सुधारणा होत नसल्याने भडकलेल्या रिक्षावाल्यांच्या संघटनांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या संदर्भात भाजपाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी निवेदनाद्वारे ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराविरोधात एक दिवसीय लक्षणीक उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. एक अधिकारी असताना रिक्षाचालकांची कामे होत असत. आता दोन दोन अधिकारी असूनही कामे करण्यास या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या मलाईदार खात्यांच्या वाटाघाटीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षाचालक नाहक भरडला जात आहे. वारंवार लक्षात आणून देखिल अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षाचालकांच्या समस्या सोडविण्याऐवजी भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे गोरखधंदे चव्हाट्यावर आणण्यासाठी येत्या सोमवारी ८ जुलै रोजी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात दिवशीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या भागाजी वझे चौकात चक्का जाम करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

rickshaw Sanghtna
ठाणे : महिलेचे थेट राजदंड हाती घेऊन आंदोलन

या संघटना होणार सहभागी

या आंदोलनात लालबावटा रिक्षा युनियन, भाजपा प्रणित डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, डोंबिवली रिक्षा चालक/मालक युनियन, एकता रिक्षा चालक/मालक सेना, आरपीआय रिक्षा-टॅक्सी चालक/मालक युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, आदर्श रिक्षा चालक/मालक युनियन, रिपब्लीकन वाहतुक सेना (आनंदराज आंबेडकर गट), आदी संघटना सहभागी होणार आहेत. रिक्षा चालकांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका

यापूर्वीही ३१ जानेवारी २०२३ रोजी आरटीओच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन छेडले होते. या खात्यात्तील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांसह रिक्षाचालकांच्या होणाऱ्या पिळवणुकीसंदर्भात लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची आणि रिक्षा चालकांची आरटीओकडून कशी लूट करण्यात येते हे आम्ही जाहीर फलकाद्वारे चव्हाट्यावर आणले होते. अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका, असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याचे भाजपाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news