उल्हासनगर : राजकीय प्रसिद्धीसाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणारे बॅनर कामगारांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत. अशाच एका दुर्दैवी घटनेत एका 25 वर्षीय कामगाराने शिवसेना शिंदे गटाचे राजकीय नेते विशाल पावशे यांचे बॅनर काढत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प 4 मधील श्रीराम चौक येथे ही दुर्देवी घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव सोहेल अनिल भिंगारदिवे (25) असे आहे. तो बॅनर काढण्यासाठी नेहमीप्रमाणे काम करत होता. बॅनरच्या लोखंडी साखळ्या आणि वायरच्या नजीकच्या संपर्कामुळे त्याला जबरदस्त शॉक लागला, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने राजकीय बॅनर लावण्याच्या अनियंत्रित प्रथेविरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर आवाज उठवत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शहरातील राजकीय बॅनरचे अनियंत्रित लावणे थांबवले पाहिजे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, असे अनेकांचे मत आहे. सध्या या प्रकरणी विशाल पावशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.